पवनीतील सावरला परिसरात वाघाने घेतला पुन्हा एकाचा बळी; एकाच आठवड्यात दुसरी घटना
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: April 4, 2024 06:58 PM2024-04-04T18:58:40+5:302024-04-04T18:58:59+5:30
वाघाचा बंदोबस्त न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार
भंडारा : मोहफुले वेचण्यासाठी कुटुंबियांसह जंगलात गेलेल्या व्यक्तीवर हल्ला करून वाघाने ठार केले. ही घटना पवनी तालुक्यातील सावरला वन क्षेत्रात गुरूवारी दुपारी घडली. ताराचंद लक्ष्मण सावरबांधे (६०, सावरला, ता. पवनी)) असे मृताचे नाव असून एकाच आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे जनक्षोभ वाढला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ताराचंद सावरबांधे हे आपल्या कुटुंबियांसह मोहफुलें वेचण्यासाठी प्रादेशिक वनविभागाच्या सावरला परिसरातील कंपार्टमेंट ३१३ मध्ये गुरुवारी सकाळी गेले होते. सावरल्यावरून शेळी गावाकडे जाणाऱ्या रोडवरील मोहफुले वेचत परिवारातील मुलगा व पत्नी दुसऱ्या झाडाकडे मोह वेचण्याकरिता गेले. या दरम्यान, वाघाने ताराचंदवर झडप घेतली. यात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे पत्नी व मुलगा हादरून गेले. त्यांनी गावात कळविताच ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. दरम्यान प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह घटनास्थळी पोहचून नागिरकांची समजूत घातली. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे नेण्यात आले. दरम्यान जनतेचा आक्रोश पाहण्यासारखा होता. घटनास्थळी जिल्हा उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी निलक, डीवायएसपी मनोज सिडाम, ठाणेदार निलेश ब्राह्मणे, यांच्यासह उपसरपंच उत्तम सावरबांधे, शिवसेना नेते अनिल धकाते, प्रशांत भुते इत्यादींनी भेट दिली.
वाघाचा बंदोबस्त न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार
सलग घटना घडूनही वनविभाग वाघाचा बंदोबस्त करत नाही. यामुळे शेतीची काम करणे, गुरे राखणे जोखिमीचे झाले आहे. सावरला-कान्हाळगाव क्षेत्र प्रादेशिक कार्यालयांतर्गत येते. लागूनच उमरेड-कऱ्हाडला व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र वाघाचा संचार सावरला परिसरात जास्त आहे. हे माहीत असूनही काहीच उपाययोजना होत नाही. दखल न घेतल्यास लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा सावरला येथील गावकऱ्यांनी दिला.
१० लाखांचा धनादेश
वन विभागाकडून ताराचंद सावरबांधेच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित १५ लाख रुपये फिक्स डीपाझिट करण्यात येणार असल्याचे उपवन संरक्षक राहुल गवई यांनी सांगितले.
६ महिन्यात चवथा बळी
यापूर्वी गेल्या आठवड्यात कनहाळगाव येथील महिलेला वाघांने हल्ला करून जिवंत मारले होते. त्या घटनेची शाई वाळत नाही तोच ही घटना घडली. ६ महिन्यात वाघाने सावरला क्षेत्रातील ४ व्यक्तीचा बळी घेतला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे.