सापळा लावला रानडुकरांसाठी अन् नाहक जीव गेला वाघाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:41 AM2023-08-18T11:41:20+5:302023-08-18T11:43:05+5:30
शेतकऱ्याने दिली कबुली : शनिवारपर्यंत कोठडी
तुमसर (भंडारा) : खंदाड येथील वाघाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरील पडदा आता दूर झाला आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात वाघ मरून पडलेला होता, त्याच शेतकऱ्याने रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी लावलेल्या विजेच्या सापळ्यात अडकून या वाघाचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. शेतकरी रतनलाला वाघमारे याने तशी कबुली दिली असून, त्याला १९ ऑगस्टपर्यंत वन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
खंदाड या गावातील रतनलाला वाघमारे याच्या धानाच्या शेतात वाघाचे शव कुजलेल्या अवस्थेत आणि झाडांच्या फांद्यांनी झाकून ठेवलेले आढळले होते. वनविभागाचा संशय बळावल्याने पथकाने शेतकऱ्याच्या घराची झडती घेतली असता तार आणि खांब आढळले होते. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, रानडुकरांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी आपणच विजेचा सापळा लावला होता. मात्र, त्यात वाघाचा मृत्यू झाला.
वाघ मारण्याचा आपला जराही हेतू नव्हता, अशी कबुली त्याने दिली आहे. यावरून वन अधिकाऱ्यांनी वनकलम भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ३९, ५१, ५७ गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयापुढे हजर केले. या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी आहेत काय, याच्या तपासाठी वन कोठडीची मागणी केली असता त्याला १९ ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली.
याप्रकरणी पुन्हा आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता तुमसर वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी सी. जी. रहांगडाले यांनी वर्तविली आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे विजेचा प्रवाह शेतकरी शेताभोवती सोडतात, यातूनच ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
शेतकरी प्रचंड तणावात
शेतामधील सापळ्यात मागील गुरुवारी वाघ अडकून मृत झाला. ही घटना लक्षात आल्यापासून शेतकरी रतनलाला वाघमारे प्रचंड तणावात होता, अशी माहिती पुढे आली आहे. वाघाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, हे लक्षात आल्याने त्याने झाडाच्या फांद्यांनी शव झाकून ठेवले. विशेष म्हणजे, वाघाचे सर्व अवयव शाबूत होते, यावरून अवयवासाठी वाघाची शिकार झाल्याची शक्यता प्राथमिक तपासात पुढे आलेली नाही.