स्वतःची जमीन स्वेच्छेने दान करणारे गाव 'ग्रामदान पांजरा'; शेतकऱ्यांनी स्वतः च्या जमिनीतील जमीन स्वेच्छेने केली दान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:27 PM2024-08-26T12:27:28+5:302024-08-26T12:28:21+5:30
Bhandara : आचार्य विनोबा भावे यांनी सुरु केलेल्या ग्रामदान चळवळीस अनुसरून ग्रामदान गावांची स्थापना
राजू बांते
भंडारा : आचार्य विनोबा भावे यांनी सुरु केलेल्या ग्रामदान चळवळीस अनुसरून ग्रामदान गावांची स्थापना करण्यात आली. आचार्याच्या विचाराने प्रेरित पांजरा ग्राम मंडळ १९७३ ला अस्तित्वात आले. पांजराग्रामच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतः च्या जमिनीतील चार आर जमीन स्वेच्छेने दान केली. म्हणून हा गाव ग्रामदान पांजरा म्हणून ओळखला जातो.
१९५० ते ६० या काळात आचार्य विनोबा भावे यांनी देशभरात पदयात्रा सुरू केली होती. जमीन दान करण्याचे आवाहन करत होते. यातूनच भूदान चळवळीचा जन्म झाला. या चळवळीतून आचार्य विनोबांना लाखो एकर जमीन दान मिळाली. त्यानंतर विनोबांनी ती जमीन अल्पभूधारक, जमिनी नसलेल्या लोकांना वाटली. यातूनच ग्रामदान संकल्पना अस्तित्वात आली. ग्रामदान म्हणजे गावातील जमिनीची संपूर्ण मालकी त्या गावची राहील. गावातील लोकांनी ग्रामदान मंडळ तयार करून गावातील संपूर्ण जमिनीची मालकी त्या गावाकडे असेल. त्यानंतर गावातील भूमिहीन, अल्पभूधारक ग्रामदानातून जमिनीची मागणी करू शकतील.
महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम १९६४ ला लागू करण्यात आला. या अधिनियमांतर्गत मोहाडीच्या पश्चिमेकडील टोकावर ग्रामदान पांजरा गाव आहे. पांजरा रामदास मंडळ १९७३ वर्षी अस्तित्वात आले. ग्रामदान पांजरा हे गाव जिल्हाधिकाऱ्यांच्या क्षेत्राधिकाऱ्याखाली आहे. त्या गावात सरपंच हा पदनाम नाही. ग्राम मंडळ 'पांजरा ग्राम' या नावाचे एक व्यक्तीभूत मंडळ तयार झाले आहे. त्या मंडळाचे सध्या अध्यक्ष महेंद्र मते आहेत. ग्राम मंडळाची संख्या दोन ते चौदापेक्षा अधिक राहत नाही. मागील पंचवार्षिक काळात ग्राम मंडळाची संख्या १४ होती. आत्ता एक अध्यक्ष, उपाध्यक्ष व पाच सदस्य अशी सात कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
हात वर करून अध्यक्षांची निवड
ग्रामदान मंडळ या संकल्पनेत मंडळात अध्यक्ष निवडला जातो. लोकसंख्येच्या एकपंचमांश मतदारांतून हात वर करून अध्यक्ष निवडीची पद्धत आहे. अध्यक्ष सदस्यांची निवड करून गावाच्या विकासासाठी आवश्यक ती कामे करतात.
सध्याच्या घडीला ग्रामदान पांजरा गावाची लोकसंख्या २१० आहे. या गावात एक ते चौथ्या वर्गापर्यंतची शाळा आहे. शाळेला केवळ एकच शिक्षक आहे. त्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतला एक हिस्सा दान केला आहे. साधारणतः ग्राम मंडळाकडे नऊ ते दहा एकर जमीन आहे, तसेच त्या गावाला भूदानमधून २५ एकर जमीन मिळाली आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, गावातील काही लोक भूमिहीन आहेत. भूदानमधील जमीन दहा भूमिहीन व्यक्तींना वाटून देण्यात आल्या आहेत. भूदानमधील ज्या जमिनी तुम्हीही व्यक्तींना वाटून दिल्यात त्यांना ग्रामदान किसान असे म्हटले जाते. ग्रामदान मंडळ असले तरी शासनाकडून विविध निधी येत असते. पण अजूनही हवा तेवढा ग्रामदान पांजरा या गावाचा विकास झालेला नाही.
"सातबाराच्या उताऱ्यावर ग्रामदान असा स्पष्ट उल्लेख आहे. या जमिनीचे ठीक आहे. पण उर्वरित शेतजमिनीचे फेरफार केले जात नाही. तहसीलदार व जिल्हाधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. यामुळे भविष्यात पुढच्या पिढीला मनःस्ताप सहन करावा लागणार आहे."
- महेंद्र मते, अध्यक्ष ग्राम मंडळ, पांजरा