दीड वर्ष तरुणीवर अत्याचार, नंतर अश्लील व्हिडीओ केला व्हायरल, तरुणास अटक
By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: September 6, 2022 15:39 IST2022-09-06T15:36:07+5:302022-09-06T15:39:00+5:30
इंस्टाग्रामवर तरुणीच्याच नावावर फेक अकाउंट उघडले व तिचे व्हिडीओ व्हायरल केले.

दीड वर्ष तरुणीवर अत्याचार, नंतर अश्लील व्हिडीओ केला व्हायरल, तरुणास अटक
भंडारा : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल दीड वर्ष तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर तरुणीच्याच नावावर फेक अकाउंट तयार करून तिचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पवनी तालुक्यातील एका गावात हा धक्कादाय प्रकार समोर आला असून अड्याळ पोलिसांनी तरुणाला मंगळवारी अटक केली.
केशव दिलीप वैद्य (२५) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पवनी तालुक्यातील एका गावातील केशवने २० वर्षीय तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एप्रिल २०२१ पासून दीड वर्ष वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरुन बिनसले. त्यानंतर इंस्टाग्रामवर तरुणीच्याच नावावर फेक अकाउंट उघडले व तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केले.
हा प्रकार तरुणीला माहित झाला. तिने सोमवारी रात्री ९.३० वाजता पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस ठाणे गाठून केशवच्या विरुद्ध तक्रार दिली. त्यावरून अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी भादंवि कलम ३७६ (२), (एन) सहकलम ६७ (अ) आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. केशव वैद्य या तरुणाला मंगळवारी पहाटे अटक केली. या प्रकरणाचा तपास आता पवनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गढरी यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पवनी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.