मेन्टेनन्सअभावी एबी स्विच वर्षभरापासून सुरूच
By Admin | Published: June 8, 2017 12:24 AM2017-06-08T00:24:47+5:302017-06-08T00:24:47+5:30
वीज पुरवठा सुरळीत करताना ११ केव्हीच्या जीवंत वीज तारांना स्पर्श झाल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली.
वीज वितरण कंपनीचा प्रकार : अपघाताला अधिकारी जबाबदार
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वीज पुरवठा सुरळीत करताना ११ केव्हीच्या जीवंत वीज तारांना स्पर्श झाल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. यात तिला उजवा हात गमवावा लागला. या जनित्रावरील वीज पुरवठा बंद करण्याची एबी स्विचची देखभाल दुरूस्ती वर्षभरापासून करण्यात आलेली नसल्याने तो सुरूचं आहे. याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात घडला असून याला येथील अधिकारी दोषी आहेत.
जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय महामार्गावर वीज वितरण कंपनीच्या दक्षिण क्षेत्राचे ०८७००९/२०६/पो९४ वर जनित्र आहे. या जनित्रावर तांत्रिक बिघाड आल्याने तो सुरळीत करताना २९ मे ला संध्या खोब्रागडे ही महिला भाजली. यात तिचा उजवा हात निकामी झाल्याने गमवावा लागला. या गंभीर प्रकरणावर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून आता सावरासावर करण्यात येत आहे. त्यामुळे यातील एक गंभीर बाब आता समोर आली आहे.
या जनित्रावरून ११ केव्हीचा विद्युत पुरवठा केल्या जातो. वीज पुरवठा चालूबंद करण्यासाठी येथे एबीस्विच लावलेले आहे. मात्र, एबी स्विचच्या शेवटच्या पॉर्इंटच्या ‘पोस्ट इंसुलेटर’मध्ये स्फोट झाल्याने तो वर्षभरापासून निकामी आहे. त्या पॉर्इंटला ‘जंपर’ करून थेट वीज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे एबी स्विच बंद केल्यानंतरही वीज पुरवठा सुरू होता. १५ दिवसापूर्वीच दक्षिण क्षेत्रात रुजू झालेल्या संध्या खोब्रागडे या महिला वीज तांत्रिक कर्मचाऱ्याला ही बाब माहित नव्हती. त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला.
जुलै २०१६ पासून स्विच सुरू
वीज पुरवठा बंद करण्यासाठी असलेले एबीस्विच हे निकामी आहे. जुलै २०१६ मध्ये येथील शेवटच्या पॉर्इंटवर स्फोट झाला होता. या रात्री शहरातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. तो सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य वीज कंपनीकडे उपलब्ध नसल्याने वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्याने जंपर करून वीज पुरवठा थेट केला होता. तब्बल ११ महिन्यापासून वीज कंपनीने या गंभीर बाबीची वेळीच दखल घेऊन तो दुरूस्त केला असता, तर संध्याचा अपघात झाला नसता.