अबब..! स्वयंपाक खोलीत दडून होते तब्बल १२ विषारी नाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:14+5:302021-07-24T04:21:14+5:30
मांडेसर येथील घटना मोहाडी : तालुक्यातील मांडेसर येथील किशोर लिल्हारे यांच्या स्वयंपाकघरातून एक दोन नव्हे, तर तब्बल १२ ...
मांडेसर येथील घटना
मोहाडी : तालुक्यातील मांडेसर येथील किशोर लिल्हारे यांच्या स्वयंपाकघरातून एक दोन नव्हे, तर तब्बल १२ विषारी नाग साप निघाल्याची घटना घडल्याने गावात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे दृश्य बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.
रात्री ९ वाजेच्यादरम्यान स्वयंपाक खोलीतील एका कोपऱ्यात काहीतरी हालचाल होत असल्याचे जाणवल्याने त्या दिशेने बघितले असता, एक-दोन नागाची पिली असल्याचे दिसल्याने घरातील सर्वच घाबरले. त्वरित सर्पमित्रांना फोन करून बोलाविले असता, सुमारे दोन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सर्पमित्रांनी या बाराही सापांना स्वयंपाक खोलीतील वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. तेव्हा कुठे लिल्हारे कुटुंबाच्या जिवात जीव आला व आलेल्या संकटातून त्यांना संरक्षण मिळाले. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात साप निघण्याच्या घटना खूप जास्त प्रमाणात होतात.
स्वयंपाकघरात सापाची पिली असल्याची माहिती सर्पमित्र दिनेश गराडे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या चमूसह घटनास्थळी धाव घेत सापांची शोधाशोध सुरू केली. तेव्हा स्वयंपाक खोलीत एक नव्हे, तर तब्बल १२ विषारी नागाची पिली आढळून आली. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे सर्व साप पकडायला दोन तास लागले. सर्पमित्र दिनेश गराडे, दीपक नागपुरे, मुन्ना बोरकर यांनी या सापांची नोंद कान्द्री वन विभागात करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले. तब्बल १२ विषारी नाग साप निघाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्पर मदत मिळाल्यामुळे किशोर लिल्हारे यांच्या कुटुंबियाने सर्पमित्रांचे आभार मानले आहे, मात्र आताही स्वयंपाक खोलीत जाताना त्यांना भीती वाटत आहे.