बापरे..! वीज कार्यालयात आढळले चक्क १० विषारी साप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 11:11 AM2023-07-08T11:11:32+5:302023-07-08T11:11:57+5:30
लाखांदूर येथील प्रकार : फरशी फोडून सापांना काढले बाहेर
लाखांदूर (भंडारा) : येथील वीजवितरण कार्यालयात चक्क अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जवळपास दहा साप आढळून आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीला आली. सर्पमित्रांनी दिवसभर शोध मोहीम राबवून कार्यालयातील फरशी फोडून जवळपास दहा सापांच्या पिल्लांना जिवंत पकडले.
सकाळची वेळ. अधिकारी- कर्मचाऱ्यांनी कार्यालय गाठून आपला दैनंदिन कामकाज सुरू केला. पहिल्याच प्रहरात कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला पाण्याच्या कॅनखाली एक साप आढळून आला. थोडा वेळ होत नाही तर कार्यालयात काम करीत बसलेल्या एका कर्मचाऱ्याला फरशीवरून पुन्हा एक साप जाताना दिसून आला. अन्य दुसऱ्या खोलीतील कर्मचाऱ्यांनादेखील असे साप दिसून आले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याची माहिती सर्पमित्रांना दिली. लाखांदूर येथील सर्पमित्र सुशील सिल व सहकारी मित्र पवन दिवठे यांनी तत्काळ लाखांदूर येथील वीजवितरण कार्यालय गाठत सापांचा शोध सुरू केला. सकाळपासून सापांचा शोध सुरू केला असता अधिकारी कर्मचारी काम करीत असलेल्या खोल्यांमध्ये तब्बल दहा सापांची पिल्ले आढळून आली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफिने सापांना पकडून बॉटलमध्ये कैद केले.
सर्पमित्राने चक्क अधिकारी, कर्मचारी बसत असलेल्या खोलीचा भाग फोडून सापांचा शोध घेतला. या शोध मोहिमेत जास्तीत जास्त नाग जातीच्या सापाची पिल्ले आढळून आली. कार्यालयात सापांची शोधमोहीम सायंकाळी पाच वाजतापर्यंत सुरू होती हे मात्र विशेष.
दिवसभर कामकाज ठप्प
सकाळी दहा वाजतापासूनच कार्यालयात साप निघण्याचा सपाटा सुरू होताच सर्पमित्रांनी सापांसाठी शोधमोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी चांगलेच भयभीत झाले असून त्यांनी चक्क दिवसभर कामकाज ठप्प ठेवून सर्पमित्रांना साप शोधण्याच्या मोहिमेत सहकार्य केले.