अभाविपचे ‘महाविद्यालये उघडा आंदोलन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:37 AM2021-02-11T04:37:26+5:302021-02-11T04:37:26+5:30
मोहाडी : कोविड१९च्या परिस्थितीमुळे गेल्या ११ महिन्यांपासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. कोविडच्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात सुधार आले ...
मोहाडी : कोविड१९च्या परिस्थितीमुळे गेल्या ११ महिन्यांपासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. कोविडच्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात सुधार आले असून राज्य सरकारद्वारे दारूची दुकाने, मॉल, सिनेमागृहे व परिवहन सेवा तसेच राज्यातील पहिली ते पाचवी व नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मग, महाविद्यालयेच बंद का, असा प्रश्न विद्यार्थी परिषद राज्य सरकारला विचारत आहे. महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा उपयोग करण्यात येत आहे. परंतु त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे होताना दिसत आहे. ऑनलाइन पद्धतीचा वापर करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. राज्यातील सर्व महाविद्यालये त्वरित उघडण्यात यावीत, या मागणीला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत २ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात प्रत्येक तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर व महाविद्यालीन स्तरावर ‘महाविद्यालय उघडा आंदोलन’ करण्यात आले. दरम्यान, मोहाडी तालुक्यातील स्थानिक एन. जे. पटेल महाविद्यालय मोहाडीच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वत:च्या हक्कासाठी व शिक्षणाविषयी निद्रिस्त असलेल्या महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आले व एन. जे. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनामध्ये अभाविप पूर्व जिल्हा संयोजक महेंद्र गभने, आकाश निमकर, मीनल जीभकाटे, कमलेश मानकर, स्नेहल चाचीरे, हसन सेलोकर, मयूर निमकर, सुलोचना कुंभलकर व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मोहाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.