जिल्ह्यात ६० टक्के पुरूष करतात तंबाखू सेवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:33 AM2020-12-29T04:33:53+5:302020-12-29T04:33:53+5:30
भंडारा जिल्हा ग्रामीण बहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. १५ वर्षावरील पुरूषांचे ...
भंडारा जिल्हा ग्रामीण बहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. १५ वर्षावरील पुरूषांचे प्रमाण ६०.६७ टक्के आहे. तर याच वयोगटातील महिलांचे प्रमाण १९.७ टक्के आहे. विशेष म्हणजे राज्याचे पुरूषांचे प्रमाण ३३.८ टक्के तर महिलांचे प्रमाण १०.९ टक्के आहे. राज्याचा विचार करता भंडारा जिल्ह्यात दुप्पट व्यक्तींना तंबाखूचे व्यसन असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात तंबाखूला चूना लावून मळून खाण्याचे प्रमाण अधिक आहे. तर शहरी भागात खर्रा अधिक प्रमाणात सेवन केला जातो. धुम्रपानाच्या बाबतीतही तसेच आहे. ग्रामीण भागात विडी तर शहरी भागात सिगारेट ओढाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तंबाखूमुळे कर्करोगासह इतर विविध आजार होत असल्याची प्रत्येकाला जाणीव असली तरी व्यसन सूटता सूटत नाही. अनेकांनी तंबाखू सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा त्याची सवय लागली. परंतु तंबाखू सोडणे सहज शक्य आहे. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे.
बॉकस
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावहीन
शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि धूम्रपान करण्यास कायद्याने बंदी आहे. त्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा २००३ अस्तित्वात आहे. मात्र शाळा, महाविद्यालयाच्या २०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांना बंदी घातली आहे. परंतु असे असताना शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि धूम्रपान करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शासकीय कार्यालयाच्या भींती आणि कोपरे पान- खर्ऱ्याने रंगलेल्या दिसून येतात. ठिकठिकाणी फलक लावले असले तरी त्याचा उपयोग होत नाही. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावहीन दिसून येतो.
बॉक्स
तरूणांमध्ये खर्रा खाण्याचे प्रमाण अधिक
सुपारीचे तुकडे आणि तंबाखू याचे मिश्रण करून तयार होणारा खर्रा तरूणांमध्ये अधिक लोकप्रीय आहे. पानठेल्यावर २० रुपयापासून ५० रुपयांपर्यंत खर्राची पुडी विकत मिळते. अनेक ठिकाणी तर खर्रा घोटण्यासाठी स्वंचलीत मशीन आणल्या आहेत. सुगंधी तंबाखू आणि इतर मिश्रण टाकून घोटलेला खर्रा खाणे प्रतीष्ठेचे झाले आहे. तरूणांसोबतच महिलांमध्येही खर्रा खाण्याची क्रेज अलिकडे वाढत आहे. शेतात आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजूर महिला खर्रा सेवन करतात
बॉक्स
तंबाखूमुक्त शाळा अभियान
विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी भंडारा जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि सलाम मुंबई फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहीम राबविण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहे. विद्यार्थ्यांमुळे त्यांच्या पालकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे सोडल्याचेही जिल्ह्यात उदाहरणे आहेत.