फरार आरोपीला चंद्रपुरातून अटक
By Admin | Published: March 15, 2017 12:15 AM2017-03-15T00:15:26+5:302017-03-15T00:15:26+5:30
लाखांदूर येथील एका गरीब कुटुंबातील मुलीला पैशाचे प्रलोभन देऊन पाच तरूणांनी सामूहिक अत्याचार केला. यातील चार तरूणांना रविवारला अटक झाली.
प्रकरण अत्याचाराचे : दोघांना पोलीस कोठडी, तिघांची बाल सुधारगृहात रवानगी
भंडारा : लाखांदूर येथील एका गरीब कुटुंबातील मुलीला पैशाचे प्रलोभन देऊन पाच तरूणांनी सामूहिक अत्याचार केला. यातील चार तरूणांना रविवारला अटक झाली. फरार सौरभ उपरे याला चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथून रविवारला रात्री अटक करण्यात आली. यातील दोघांची पोलीस कोठडीत तर तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याप्रकरणात आरोपींचे कपडे, मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
लाखांदूर येथील पाच तरूणांनी १६ वर्षीय मुलीवर जंगलात नेऊन २५ फेब्रुवारीला सामूहिक अत्याचार केला. दरम्यान त्यांनी अत्याचाराची मोबाईलवर चित्रफित तयार करून नंतर ती सोशल मिडीयावर व्हायरल केली. त्यामुळे या प्रकरणाची वाच्यता झाली. दरम्यान आरोपीकडून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्यामुळे पीडित भयभीत झाली होती.
सदर प्रकरण ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच लाखांदूरचे प्रभारी ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे यांनी या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून पीडित मुलीचा शोध घेतला. तिच्या तक्रारीवरून पाच तरूणांविरूध्द गुन्हा नोंदवून चार तरूणांना अटक केली.
या प्रकरणात इसरार, सलीम, चेतन निनावे, सागर हुकरे यांना अटक केली होती. सौरभ उपरे हा फरार झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. दोन १८ वर्षांचे आहेत. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात तर सागर हुकरे व चेतन निनावे याची १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
अनेकांचे होणार मोबाईल जप्त
सामूहिक अत्याचार करून तिची चित्रफित तयार करून या तरूणांनी ती सोशल मिडीयावर व्हायरल केली. या तरूणांनी ज्यांना-ज्यांना ही चित्रफित पाठविली ते व अन्य व्यक्तींकडून आणखी किती मोबाईलवर चित्रफित पाठविली ते सर्व मोबाईलधारक आता चौकशीच्या घेऱ्यात येणार आहेत. या सर्वांचे मोबाईल जप्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान पोलीस कारवाईच्या भीतीने अनेकांनी त्यांच्या मोबाईलमधील चित्रफित ‘डीलिट’ केली आहे.
अत्याचारात वापरलेले साहित्य जप्त
आरोपींनी सामूहिक अत्याचारासाठी वापरलेल्या दोन दुचाकींना जप्त केल्या आहेत. या दोन दुचाकींमध्ये एमएच ३६ व्ही ८०१ व एमएच ३६ एस ७२२७ या दुचाकींचा समावेश आहे. यासोबत आरोपींनी घटनेच्या दिवशी घातलेले कपडे व त्यांचे मोबाईल जप्त केले आहे.
या गंभीर प्रकरणाचा तपास करून आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. यात आतापर्यंत दुचाकी, कपडे व मोबाईल जप्त केले आहेत. आरोपींच्या मोबाईलमधील चित्रफित ज्या-ज्या मोबाईलवर पोहचली ते सर्व मोबाईल जप्त करण्याच्या दृष्टिने कारवाई करण्यात येत आहे.
- सुरेश ढोबळे ,
प्रभारी ठाणेदार, लाखांदूर.