सीईओंच्या अनुपस्थितीने स्थायी समितीत गदारोळ
By admin | Published: July 15, 2016 12:42 AM2016-07-15T00:42:56+5:302016-07-15T00:42:56+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज गुरूवारला आयोजित करण्यात आली होती.
शिक्षक बदली प्रकरणावरून रणकंदन : वेळकाढू धोरणाचा पदाधिकाऱ्यांनी केला निषेध
भंडारा : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आज गुरूवारला आयोजित करण्यात आली होती. या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र निंबाळकर हे अनुपस्थित राहिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला. त्यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर असल्याने पदाधिकाऱ्यांनी चांगलाच गदारोळ घातला.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामांचे नियोजन करण्यात येते. यासंदर्भात गुरूवारला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या सभाध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अध्यक्षांसह उपाध्यक्ष व सर्व समिती सभापती यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
दुपारी १ वाजता सुरू होणाऱ्या या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्यासह शिक्षणाधिकारी किसन शेंडे, वित्त अधिकारी यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर होते. त्यामुळे पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या अनुपस्थितीबाबत संताप व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या प्रकरण गाजत आहे. बदल्या प्रकरणावर राज्य शासनाने स्थगिती दिली आहे, असे असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने बदली प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे शिक्षकांची कार्यसेवा सध्या अधांतरी आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये जि.प. प्रशासनाविरूद्ध प्रचंड रोष आहे.
या स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित करून शिक्षकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत होती. मात्र मुख्य कार्यपालन अधिकारी निंबाळकर हेच अनुपस्थित असल्याने संतप्त पदाधिकारी व सदस्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी जोपर्यंत सभागृहात येत नाही तोपर्यंत सभा सुरू करायची नाही, असा मुद्दा रेटून धरला.
पदाधिकारी व सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. या भितीमुळे कदाचित सीईओ सभागृहात न येता त्यांनी पळवाट काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सदस्यांनी लावला. (शहर प्रतिनिधी)