वन अधिनियमात अडकला क्वॉर्ट्सचा मुबलक साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:44+5:302021-08-14T04:40:44+5:30
तुमसर : सातपुडा पर्वत रांगेच्या भूगर्भात तुमसर तालुक्यात क्वॉर्ट्सचा (पांढरे दगड) मुबलक साठा उपलब्ध असून हा संपूर्ण परिसर ...
तुमसर : सातपुडा पर्वत रांगेच्या भूगर्भात तुमसर तालुक्यात क्वॉर्ट्सचा (पांढरे दगड) मुबलक साठा उपलब्ध असून हा संपूर्ण परिसर जंगलाने वेढलेला आहे. परिणामी उत्खननाला परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळेच येदरबुची येथील क्लस्टर प्रकल्प मागील दोन वर्षांपासून धूळखात पडून आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्याचे निर्देश खा. प्रफुल्ल पटेल यांनी खनिकर्म महामंडळाचे महाप्रबंधक यांना दिले.
तुमसर तालुक्यात जगप्रसिद्ध दोन मॅग्निज खाणी आहेत. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात भूगर्भात क्वॉर्ट्स अर्थात पांढरा दगड आहे. या दगडाचा उपयोग अनेक ठिकाणी करण्यात येतो. परंतु परिसरात जंगल असल्यामुळे पांढरे दगड काढण्यास वन विभाग परवानगी देत नाही. त्यामुळे या खनिजावर आधारित प्रकल्पांना येथे परवानगी मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. येदरबुची येथे क्लस्टर प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु राज्य खनिकर्म महामंडळाने परवानगी दिली नाही. हा प्रकल्प दोन वर्षांपासून रखडला आहे. प्रकल्पाची संपूर्ण माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले, आदिवासी नेते अनिल टेकाम यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांना दिली. त्यांनी राज्य खनिकर्म महामंडळाचे महाप्रबंधक प्रेमचंद टेंभरे यांच्याशी संपर्क साधून प्रकल्पाचा प्रस्ताव मुंबई मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश दिले. मात्र सध्यातरी कोणत्याच हालचाली दिसत नाहीत.
बाॅक्स
अनेकांना मिळणार रोजगार
मॅग्निज व पांढऱ्या दगडावर आधारित प्रकल्प सुरू झाल्यास स्थानिक बेरोजगारांना येथे रोजगार मिळणार आहे. परंतु त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. वन विभागाने येथे क्लस्टर प्रकल्पासाठी हिरवी झेंडी देण्याची गरज आहे. येदरबुची येथे शासकीय जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे येथे क्लस्टर प्रकल्प पूर्णत्वास येण्याची शक्यता अधिक आहे. जवळच्या मध्यप्रदेशात मॅग्निजवर आधारित अनेक लहान क्लस्टर सुरू असून त्या ठिकाणी हजारो बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला आहे हे विशेष.