तिरोडाचे तहसीलदार संजय रामटेके ‘एसीबी’च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 07:14 PM2019-07-30T19:14:04+5:302019-07-30T19:15:58+5:30
तुमसरमध्ये कारवाई; ७० हजाराची लाच घेताना अटक
तुमसर (भंडारा) / गोंदिया : रेतीच्या ट्रकवर कारवाई टाळण्यासाठी लाचेची मागणी केल्या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाचे तहसीलदार संजय यादवराव रामटेके (५४) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. तुमसर तालुक्यातील माडगी येथे एका व्यक्तीला तहसीलदारांसाठी लाच घेताना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर तहसीलदारांना अटक करण्यात आली.
अवैध रेतीचा उपसा करणाऱ्या एका ट्रकला तहसीलदार संजय रामटेके यांनी गोंदिया जिल्ह्यातील बोदलकसा जंगलात अडविले होते. ट्रक सोडविण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. तसेच तक्रारकर्त्याच्या मित्राचे दोन रेती वाहतूक ट्रकसाठी महिन्याला ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर सदर तक्रारकर्त्याने भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान मंगळवारी तुमसर तालुक्यातील माडगी येथील एका हॉटेलात सापळा रचण्यात आला. त्यावेळी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना विपील सिद्धार्थ कुंभारे (२९) रा.माडगी (तुमसर) याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या जबाबावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसीलदार संजय रामटेके यांना तिरोडा येथील तहसील कार्यालयातून ताब्यात घेतले. या दोघांना तुमसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात भंडारा येथील उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, गणेश पदवाड आदींनी केली.