माडगी शिवारात टोल नाका उभारणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:36+5:302021-06-21T04:23:36+5:30
सुमारे दोन वर्षांपूर्वी मनसर-गोंदिया राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले. या रस्त्यावर नागपूर जिल्ह्यात एक टोल नाका ...
सुमारे दोन वर्षांपूर्वी मनसर-गोंदिया राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले. या रस्त्यावर नागपूर जिल्ह्यात एक टोल नाका उभारला जात असून, दुसरा टोल नाका सुमारे ४० ते ४५ किलोमीटरनंतर तुमसर तालुक्यातील माडगी शिवारात उभारणीला वेग आला आहे.
माडगी शिवारात करडी, पालोरा, देवाडा व माडगीजवळील पंधरा ते वीस गावांची वाहतूक या राष्ट्रीय महामार्गावरून आहे. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना येथे टोल भरावा लागणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तुमसर शहराला या टोल नाक्यावरून जावे लागणार आहे. दिवसातून दोन ते तीनवेळा सरासरी ही वाहने तुमसर येथे ये-जा करतील. त्यामुळे एकाच दिवसात दोन ते तीन वेळा टोल भरावा लागणार काय, याची चिंता या वाहनधारकांना सतावत आहे. दुसरा पर्यायी रस्ता माडगी या गावातून जातो. तो रस्ता राष्ट्रीय महामार्ग बंद करणार काय हे सर्व प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहेत.
माडगी शिवारातून साकोलीकडे जाणारा रस्ता आहे. त्यामुळे या सर्व वाहनांना टोल भरावा लागणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक वाहनधारकांना या टोलपासून मुक्ती मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. टोल उभारण्याचा निर्णय हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथे दखल घेऊन किमान स्थानिक वाहनधारकांना टोलमुक्तीचा दिलासा देण्याची गरज आहे. जिथे टोल नाका उभारला जात आहे तो रस्ता अरुंद आहे. समोर लहान पूल आहे. त्यामुळे या टोलजवळ वाहतूककोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.