तुमसर बाजार समिती बरखास्तीच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:29+5:302021-07-28T04:36:29+5:30
तुमसर : पूर्व विदर्भातील धानाची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती रखास्तीच्या हालचालींना वेग आला आहे. ...
तुमसर : पूर्व विदर्भातील धानाची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती रखास्तीच्या हालचालींना वेग आला आहे. प्रशासक व प्रशासकीय मंडळाची नियुक्ती ऑगस्ट महिन्यात होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. येथे सहकार व पणन विभागाच्या नियमानुसार कामे झाली नाहीत असा ठपका ठेवण्यात आला आहे, हे विशेष.
तुमसर व मोहाडी तालुक्यात सहकारातून राजकारण अशा प्रकारचे समीकरण आहे. येथील बाजार समितीवर भाजप समर्थक पॅनलची सत्ता सध्या आहे. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल सुमारे एक वर्षाचा शिल्लक आहे. राज्यात सरकार बदलल्यानंतर या बाजारपेठेवर सत्ता काबीज करण्याकरिता हालचाली सुरू झाल्या. या बाजार समितीभोवती संपूर्ण तुमसर व मोहाडी तालुक्याचे राजकारण फिरते. या बाजार समितीवर वर्चस्व प्रस्तावित करण्याकरता सर्व राजकीय पक्षाचे प्रयत्न असतात. सहकार व पणन विभागाने बाजार समिती नियमानुसार काम झाले नाही अशाप्रकारच्या ठपका चौकशीत ठेवला त्या अनुषंगानेच कारवाई प्रस्थापित आहे. याकरिता राजकीय बळाचा सुद्धा वापर केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
विद्यमान संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर राज्य शासन येथे प्रशासक व प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करणार असे अपेक्षित आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. स्थानिक तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नियुक्तीकरिता फिल्डिंग लावली आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश राहणार असल्याची माहिती आहे. प्रशासक व प्रशासकीय मंडळात काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांची सरशी अधिक राहण्याची शक्यता आहे. प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त झाल्यानंतर येथील राजकारणाला पुन्हा गती येण्याची शक्यता आहे.