ओबीसीचे शिष्यवृत्ती फार्म स्वीकारण्यास मुदतवाढ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:43 AM2021-02-05T08:43:21+5:302021-02-05T08:43:21+5:30
भंडारा : इतर मागास प्रवर्ग व विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फार्म स्वीकारण्यास मुदतवाढ ...
भंडारा : इतर मागास प्रवर्ग व विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फार्म स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडाराच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात सहायक समाज कल्याण आयुक्त ए. एस. कवाडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
विद्यार्थ्यांकडून आवश्यक जात प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे प्रस्ताव तयार करताना शाळेला अडचण निर्माण होत आहेत. लॉकडाऊन व जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका यामुळे तहसील कार्यालयाकडून ते प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झालेला आहे. तसेच साकोली येथे उपविभाग कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या लाखनी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील जात प्रस्तावांचा काही तांत्रिक अडचणीमुळे एक महिन्यापासून विलंब होत आहे. त्यामुळे पालक वर्गाकडून शाळेकडे मुलांचे जात प्रमाणपत्र सादर होऊ शकले नाहीत. त्यामुळे फाॅर्म सादर करायला अडचणी निर्माण होत आहेत. या संबंधाने आवश्यक कागदपत्रे पालकांकडून प्राप्त होईपर्यंत शाळा समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करू शकत नाही. त्यामुळे ३० जानेवारी या मुदतीपर्यंत पालकांकडून प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे प्राप्त न झाल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास जबाबदार शिक्षक किंवा शाळा प्रशासनाला धरण्यात येऊ नये. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शिष्यवृत्ती प्रस्ताव तालुकास्तरावर ज्या धर्तीवर स्वीकारले जातात, त्याचप्रमाणे ओबीसी व विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे फाॅर्म तालुका स्तरावर करण्यात यावे, अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर सहायक आयुक्तांनी १५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ मंजूर करून तसे पत्र निर्गमित करण्याचे मान्य केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ भंडारातर्फे यावेळी जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, जिल्हा सरचिटणीस सुधीर वाघमारे, तालुका संपर्क प्रमुख तुलसी हटवार, तुमसर तालुका प्रतिनिधी विजय ठिस्के व बघेले यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.