अपघातात पती ठार-पत्नी गंभीर, दीड महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 04:34 PM2019-06-24T16:34:38+5:302019-06-24T16:35:11+5:30
परसोडीचे नवदाम्पत्य : काळाने घात केला, अर्ध्यावरती डाव मोडला
लाखांदूर (भंडारा) : अवघ्या दीड महिन्यापूर्वी विवाह झाला होता. राजा-राणीचा सुखाचा संसार सुरु होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सासुरवाडीला जाताना मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. अवघा दीड महिन्याचा संसार क्षणात उध्वस्त झाला. लाखांदूर तालुक्यातील परसोडी येथील दाम्पत्याच्या अपघाताने अख्खे गाव हादरुन गेले आहे. अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी.. असेच चित्र या दुर्घटनेनं उभारलं आहे.
लोकेश गोदाराम दिघोरे (२८) असे मृताचे नाव आहे. तर अपेक्षा लोकेश दिघोरे (२४) असे गंभीर जखमी पत्नीचे नाव आहे. लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग येथील लोकेशचा विवाह ११ मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मंगलगाव येथील कैलाश खेडीकर यांच्या अपेक्षा या मुलीसोबत झाला. भविष्याचे सुंदर स्वप्न रंगवित राजा-राणीचा संसार सुरु होता. मात्र क्रुर नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लग्नानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणण्यासाठी रविवारी सायंकाळी लोकेश आणि अपेक्षा दुचाकीने सासुरवाडी मंगलगाव येथे जात होते. चिमुरजवळ रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, मोटारसायकलने पेट घेतला. लोकेशला गंभीर स्वरुपाचा मार लागला. तर अपेक्षा मोटारसायकलला लागलेल्या आगीने सुमारे ५० टक्के जळाली. या दोघांनाही नागरिकांनी उपचारासाठी नागपूरला रवाना केले. मात्र, लोकेशचा वाटेतच उमरेडजवळ मृत्यू झाला. तर पत्नी अपेक्षा नागपूर येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघाताचे वृत्त परसोडी गावात कळताच अनेकांनी नागपूरकडे धाव घेतली. लग्नाच्या दीड महिन्यात दिघोरे परिवारावर असा कठीण प्रसंग आला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. लोकेशचे गावात किराणा दुकान असून त्यावरच चरितार्थ चालवित होता. लग्नानंतर सुखाचा संसार सुरु असताना नियतीने क्रुर डाव खेळला. लोकेशच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.