ट्रक-टिप्परच्या धडकेनंतर इंधन टाकीचा स्फोट, चालकाचा आगीत होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 04:10 PM2022-07-06T16:10:53+5:302022-07-06T17:22:00+5:30
अपघातानंतर ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट हाेऊन आग लागली आणि दोन्ही वाहन बेचिराख झाली. अपघात एवढा भीषण होता की चालकाचा अक्षरश: कोळसा झाला.
वरठी (भंडारा) : सामोरून येणाऱ्या ट्रकला भरधाव टिप्परने धडक दिल्यानंतर लागलेल्या आगीत टिप्पर चालक जळून खाक झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील दाभा येथे बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट हाेऊन आग लागली आणि दोन्ही वाहन बेचिराख झाली. अपघात एवढा भीषण होता की चालकाचा अक्षरश: कोळसा झाला.
इरफान मोहम्मद असलम शेख (२५) रा. फतेहपुर (उत्तरप्रदेश) हल्ली मुक्काम नागपूर असे मृतकाचे नाव आहे. तो बुधवारी सकाळी भंडारा - तुमसर मार्गावरून टिप्पर घेऊन नागपूरकडे जात होता. दाभा गावाजवळ त्याचे नियंत्रण गेल्याने कोळसा घेऊन समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्याच वेळी ट्रकच्या इंधन टाकीचा स्फोट झाला आणि दोन्ही वाहनांना आग लागली. ट्रक चालक कसाबसा बाहेर पडला. मात्र टिप्पर चालक जखमी अवस्थेत स्टेरिंगमध्ये अडकल्याने बाहेर पडू शकला नाही. क्षणातच आगीत तो जळून ठार झाला. जवळपास तासभर दोन्ही वाहन पेटत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वरठी ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम ताफ्यासफ घटनास्थळावर दाखल झाले. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत चालकाचा जळून कोळसा झाला होता. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, हवालदार संदीप बांते, घनश्याम गोमासे व नितीन भालाधरे यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील पेट्रोल टँकर आणि ट्रकच्या भीषण अपघाताची आठवण
मे महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात मूल मार्गावरील अजयपूरजवळील रिव्हरव्ह्यूजवळ लाकडांनी भरलेला ट्रक व डिझेल टँकर समोरासमोर धडकले. या अपघातानंतर आगीने बघता बघता भीषण रुप धारण केल्याने संपूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले ९ जण जळून खाक झाले होते. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील त्या भीषण घटनेची आठवण करून दिली.