जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:42 AM2018-08-31T00:42:16+5:302018-08-31T00:43:35+5:30
राज्यमार्गावरील दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे काम कासवगतीने सुरु करण्यात आले. मात्र वाहतूक सुरु असलेला एकेरी मार्ग वाहतूक योग्य न बनविल्याने पावसाळ्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : राज्यमार्गावरील दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतच्या दुहेरी रस्त्याचे काम कासवगतीने सुरु करण्यात आले. मात्र वाहतूक सुरु असलेला एकेरी मार्ग वाहतूक योग्य न बनविल्याने पावसाळ्यात अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये समाविष्ट करून दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहपर्यंत दुहेरी रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची लगीनघाई संबंधित कंत्राटदाराला झाल्याने मार्गाचे काम सुरु करण्यापूर्वी व खोदकाम करण्यापूर्वी वाहतुकीसाठी मार्गाची उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसे अंदाजपत्रकामध्ये अट घालण्यात येते. असे असतानाही संबंधित कंत्राटदाराने दुहेरी मार्ग सुरु असलेल्या मार्गावर आधिच मोठमोठे खड्डे असताना एक मार्ग बंद करून रस्ता खोदकामास भर पावसाळ्यात सुरुवात केली. त्यामुळे एकेरी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना तर सोडाच पादचाऱ्यांनाही त्या रस्त्यावरून चालणे कठीण झाल्यामुळे दिवसेंगणिक अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.
असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. दुर्गा मंदिर ते गभणे सभागृहापर्यंतचा रस्ता १ कि.मी. जवळपास आहे. परंतु तो रस्ता सर करण्यास दुचाकी व चारचाकी धारकाला १५ मिनिटांचा अवधी लागतो. यावरून त्या रस्त्याची कशी चाळण झाली आहे हे समजते. सार्वजनिक बांधकाम विभागाने जोपर्यंत रस्ता तयार होणार नाही तोपर्यंत वाहतुकीस रस्ताच तयार करणार नाही अशी भूमिका दबावापोटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात एखाद्याला आपले जीव गमवावे लागले तर यास लोकप्रतिनिधीला कंत्राटदाराला की सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरावे याचा खुलासा करण्यात यावा अशी संतप्त प्रतिक्रिया तुमसरवासीयांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
कोणतेही रस्ता बांधकाम करण्याअगोदर सबवे तयार केला जातो. मात्र सदर रस्त्यावरची डागडुजी ही करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावरचा रस्ताच गहाळ झाला आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. मोठा अपघात झाल्यास नगराध्यक्ष व आमदारांनाच जबाबदार धरण्यात येईल.
-इंजि.अभिषेक कारेमोरे, प्रदेश सरचिटणीस, राकाँ.