दुचाकीवरून नियंत्रण सुटले तरूणाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:26 PM2018-06-11T22:26:38+5:302018-06-11T22:26:58+5:30
दुचाकीने देव्हाडीहून तुमसरला जाताना वाहनावरून संतुलन सुटल्यामुळे एक तरूण दुचाकीहून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारला रात्री ७.३० वाजता तुमसर येथील फादर एग्नल शाळेजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : दुचाकीने देव्हाडीहून तुमसरला जाताना वाहनावरून संतुलन सुटल्यामुळे एक तरूण दुचाकीहून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारला रात्री ७.३० वाजता तुमसर येथील फादर एग्नल शाळेजवळ घडली.
घनश्याम शामराव भार्वे (३०) रा.महाकाली नगरी खापा असे मृतकाचे नाव आहे. १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका वाहन दोन तास उशिरा आल्याने त्याला वेळेवर उपचार मिळाला नाही त्यातच घनश्यामचा मृत्यू झाला. घनश्याम भावे हा देव्हाडीहून तुमसरला येत असताना फादर एग्नल शाळेजवळ त्याचे दुचाकीवरून संतुलन बिघडले. रस्त्याच्या काठावरुन वाहन स्लीप झाल्यामुळे घनश्याम रस्त्यावर फेकला गेला. त्यात डोक्याला जबर मार लागला.
मित्रांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला फोन लावला परंतु फोन लागला नाही. शेवटी खाजगी वाहनाने तुमसर शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार होत नसल्याने भंडारा जिल्हा रूग्णालात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घनश्यामच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दोन तास उशिरा पोहचली रूग्णवाहिका
अपघात झाला तेव्हा काही युवकानी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला फोन केला. वारंवार कॉल करुनही प्रतिसाद मिळाला नाही. ही रूग्णवाहिका वेळेवर आली असती तर घनश्यामचा मृत्यू झाला नसता. शासनाने सुरु केलेली १०८ ही सेवा आता उपयोगाची नाही, असा आरोप होऊ लागला आहे.
महिनाभरापूर्वी झाले होते लग्न
घनश्यामचा लग्न २७ एप्रिल २०१८ ला खापरखेडा येथे झाला. लग्नाला १ महिना १० दिवस झाले आणि त्यातच काळाने त्याच्यावर झडप घातली. घनश्यामच्या पत्नीने टोहा फोडला तेव्हा त्याच्या घरी आलेल्या लोकांचेही डोळे पाणावले होते. घनश्याम हा आधार आणि सेतु केंद्र चालवित होता. त्याच्या मागे वडील, आई, पत्नी, भाऊ वहिणी असा मोठा आप्त परिवार आहे.