जनावरे कोंबून नेणाऱ्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:17 PM2018-02-20T23:17:45+5:302018-02-20T23:18:07+5:30
चारचाकी वाहनात कोंबून निर्दयतेने सहा गार्इंना नेणाऱ्या वाहनाचा टायर फुटला. त्यानंतर वाहनचालकाने रस्त्याशेजारी वाहन उभे करून पसार झाला.
आॅनलाईन लोकमत
तुमसर : चारचाकी वाहनात कोंबून निर्दयतेने सहा गार्इंना नेणाऱ्या वाहनाचा टायर फुटला. त्यानंतर वाहनचालकाने रस्त्याशेजारी वाहन उभे करून पसार झाला. चार ते पाच तरूणांनी या वाहनाच्या काचा फोडून वाहनातून गार्इंची सुटका केली. हा प्रकार मंगळवारला सकाळी गोबरवाही शिवारात घडला. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तुमसर-कटंगी आंतरराज्यीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून गाय-बैलांची तस्करांची टोळी सक्रिय आहे. मंगळवारी सकाळी ५.३० च्या सुमारास (सीजी १८ डी ७७००) क्रमांकाच्या स्कॉर्पीयो गाडीत सहा गार्इंना पाय व तोंड बांधून निर्दयीपणे कामठी येथे नेले जात होते. टायर फुटल्याने चालकाला वाहन थांबवावे लागले. त्यानंतर तिथून वाहनचालक पसार झाला.
गोबरवाही येथील चार ते पाच तरूण सकाळी फिरायला गेले होते. वाहन रस्त्याशेजारी उभे होते. वाहनात काही हालचाल होताना त्यांना दिसली. आत डोकाऊन बघितले असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काचातून बघितले असता त्यांना आत जनावरे दिसली. त्यानंतर वाहनाच्या काचा फोडून जनावरांना बाहेर काढण्यात आले. सहा गायीपैकी दोन गार्इंचे पाय तुटलेले होते. उर्वरित तीन गाई गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. एका गाईने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. वाहनात वाहन चालकाची एकमेव सीट होती तर उर्वरित सीट काढलेल्या होत्या. बघेडा मार्गाने येथे गार्इंची तस्करी सुरू असून कामठी येथे कत्तलखान्यात गाय व बैलांना नेले जात आहेत.
मध्य प्रदेशात जनावरांची तस्करी टोळी सक्रिय आहे. यापूर्वी बैलांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला नाकाडोंगरी येथे पकडण्यात आले होते. यासर्व गायींना चिखला येथील गोसंरक्षण गौशाळेत पाठविण्यात आले. गोबरवाही पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहे.