राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढले, पुन्हा एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
By युवराज गोमास | Published: August 26, 2023 03:56 PM2023-08-26T15:56:36+5:302023-08-26T16:01:39+5:30
गावाच्या वळणावरील घटना, दुचाकी आदळली झाडावर
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरील रनेरा गावाच्या वळणावर शुक्रवारी रात्री दुचाकी झाडावर आदळल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे नागरिकांना निदर्शनास आली. माणिकराम शहारे (४०), असे मृताचे नाव असून तो मध्यप्रदेशातील वारा (वाराशिवणी) येथील रहिवासी आहे.
तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील १५ वर्षांपासून रोजंदारीचे काम करीत होता. माणिकरामचे वारा गावाकडे आठवड्यातून एकदा जाणे येणे असायचे. तुमसरात भाड्याची खोली घेऊन त्याचे वास्तव्य होते. गावाकडे भावाचे वास्तव्य असल्याने व त्यांचेकडे माणिकरामची दोन मुले असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास दुचाकीचे (एमएच ५० एमटी ५७१६) निघाला होता. दरम्यान, रनेरा गावच्या अपघातग्रस्त वळणावर असणाऱ्या झाडावर त्याची दुचाकी आदळली.
उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला. मृताच्या मागे मुलगा व मुलगी आहे. पत्नी नाही. त्यामुळे दोन्ही मुले आई वडिलांच्या प्रेमाला पोरके झाली आहेत. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.
रात्रभर पडून होता मृतदेह
रात्रीच हा अपघात झाला, मात्र ते कुणाच्याही लक्षात न आल्याने रात्रभर त्याचा मृतदेह घटनास्थळी पडून होता. या राष्ट्रीय महामार्गावरून रात्रभर वाहने धावतात, तरीही कुणाचेही अपघातग्रस्त दुचाकीकडे लक्ष गेले नाही. शनिवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना दुचाकी झाडावर आदळल्याचे व लगतच मृतदेह पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. यानंतर घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना देण्यात आली.
महामार्गावरील खड्डे धोकादायक
राष्ट्रीय महामार्गावरील तुमसर ते मोहगाव खदान गावांचे पर्यंत महामार्गावर खड्डे पडले आहेत. महामार्गावर चक्क भेगा पडल्या आहेत. यामुळे वाहन चालविणे धोकादायक झाले आहेत. आधीच अरुंद असणाऱ्या या महामार्गावरील सिहोरा ते सिंदपुरी आणि बपेरा दरम्यान महामार्गवर जाोजागी खड्टे पडले आहेत. हे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.