पीएसआय चिडे हत्याकांडातील मोक्काचा आरोपी निघाला दुचाकी चोर, पोलीसांची कारवाई
By जितेंद्र ढवळे | Published: April 5, 2023 10:08 PM2023-04-05T22:08:17+5:302023-04-05T22:08:51+5:30
त्याचा सहकारी फरार असून या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
भिवापूर : पीएसआय छत्रपती चिडे हत्याकांडातील मोक्का लावलेला आरोपी सराईत दुचाकी चोर निघाला आहे. भिवापूर पोलीसांनी त्याला मंगळवारला (दि.४) मध्यरात्री भंडारा जिल्ह्यातून अटक केली. त्याचा सहकारी फरार असून या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
विक्की उर्फ विकेश जांभुळे (३०) रा. कन्हाळगाव ता. पवनी जि. भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर करण मानापुरे रा. बेळघाट ता. पवनी जि. भंडारा असे फरार आरोपीचे नाव आहे. यातील विक्की उर्फ विकेश हा २०१८ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक छत्रपती चिडे हत्याकांडातील मोक्काचा आरोपी आहे. प्राप्त माहिती नुसार गत सोमवारी (दि.३) मध्यरात्रीच्या सुमारास लगतच्या गाडेघाट (पुनर्वसन) येथील स्वप्नील जनार्धन मेश्राम या तरूणाची निळ्या रंगाची पल्सर क्र. एम.एच. ४० ए.यु. १७६१ ही दुचाकी त्याच्या घराच्या अंगणातून चोरीला गेली.
याबाबत फिर्यादी स्वप्नीलने तक्रार नोंदविताच, पोलीसांनी अन्वये गुन्हा नोंदवित, शोध सुरू केला होता. स्वप्नीलने चोरी गेलेल्या दुचाकीचे फोटो मित्रांना व्हॉटसॲपवर पाठविले होते. दरम्यान आरोपी सदर दुचाकीने पवनी परिसरात फिरत असल्याचे फिर्यादीला मित्राकडून कळले. लागलीच ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे व कर्मचाऱ्याच्या पथकाने मंगळवारला (दि.४) मध्यराञी पवनी तालुक्यात कन्हाळगाव गाठत, आरोपी विक्की उर्फ विकेशला त्याच्या घरून अटक केली. तर त्याचा सहकारी करण मानापुरे हा मात्र अद्यापही फरार आहे.
७ एप्रिल पर्यंत पोलील कोठडी -
आरोपी विक्कीला बुधवारला (दि.५) न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला ७ एप्रिल पोलीस कोठडी मिळाली. पोलीसी खाक्या दाखविताच, त्याने गुन्हा कबुल करीत, चोरी केलेली दुचाकी चामोर्शी परिसरात विकल्याचे सांगितले.
काय आहे ‘चीडे’ हत्याकांड -
पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे हे नागभीड पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. पेट्रोलिंग करीत असतांना, दारूचा अवैध साठा घेऊन, भरधाव येणाऱ्या वाहणाने चिडे यांना चिरडले होते. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. २०१८ मधील ‘चिडे हत्याकांडाने’ महाराष्ट्र हादरला होता. शंभरावर संशयीतांची चौकशी तर डझणावर आरोपींना अटक झाली होती. यात एका स्थानिक आरोपीचाही समावेश होता.