आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:07 PM2018-05-11T23:07:16+5:302018-05-11T23:07:16+5:30
वरठी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून ओमप्रकाश दहिया यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकुने हल्ला करून जखमी केले, असा आरोप सिध्द झाल्यामुळे आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा शनिवारला जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वरठी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून ओमप्रकाश दहिया यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकुने हल्ला करून जखमी केले, असा आरोप सिध्द झाल्यामुळे आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा शनिवारला जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी सुनावली.
भगत महादेव मांझी (३२) रा.नागफेना, जि.बालांगीर, उडीसा, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ओमप्रकाश दहिया रा.ओशियार, जि.जोधपुर, हे वरठी येथील सनफ्लॅग कारखान्यात जे.के. ट्रान्सपोर्ट येथे सुपरवायझर म्हणून काम करीत आहे. वरठी येथे भगत मांझी व नवरतन नैताम भाड्याने राहत होते. २९ एप्रिल २०१६ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भगत मांझी यांचा हेल्पर सिताराम नाईक हा ओमप्रकाश दहिया यांच्याकडे जेवनासाठी आला. त्यानंतर सिताराम नाईक गावी जात असल्याने भगत मांझी याने त्याला वरठी रेल्वेस्थानकात सोडण्याकरिता ओमप्रकाश दहिया यांना दुचाकी मागितली. परंतु मांझी हा दारू प्याला असल्याने त्याला दुचाकी दिली नाही.
ओमप्रकाश यांनी रेल्वेस्थानकावर सोडून देतो असे बोलून दहा वाजताच्या सुमारास तिघेही दुचाकीने रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघाले. काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकीच्या मागे बसलेल्या भगत मांझी याने सिताराम नाईक याला रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून ओमप्रकाशला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मानेवर व गळ्यावर भाजी कापण्याच्या चाकुने वार केले. यात ओमप्रकाश जखमी झाला. त्याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यातल आले. याप्रकरणी वरठी पोलिसांनी आरोपी भगत मांझी याच्याविरुध्द गुन्हे नोंदविले. तपासादरम्यान साक्षपुरावे गोळा करण्यात आले. मात्र, आरोपीचा शोध लागला नाही. त्यानंतर आरोपीला घटनेच्या पाच महिन्यानंतर उडीसा राज्यातील नागफेना येथून १७ आॅक्टोंबर २०१६ रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणाचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. साक्ष व पुराव्याअंती न्यायालयाने मांझी याला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील प्रमोद भुजाडे यांनी काम पाहिले.