करडीत अतिसाराची लागण
By admin | Published: February 1, 2016 12:33 AM2016-02-01T00:33:32+5:302016-02-01T00:33:32+5:30
करडी गावात मागील २० दिवसांपासून जवळपास २०० लोकांना पाण्यापासून होणाऱ्या आजारांची लागण झाली आहे.
नाल्या घाणीने तुंबलेल्या : पाणी वापरण्यास मनाई
करडी/पालोरा : करडी गावात मागील २० दिवसांपासून जवळपास २०० लोकांना पाण्यापासून होणाऱ्या आजारांची लागण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या चाचणीत पाणी दूषित आढळून आल्याने पिण्यासाठी वापरण्यास मनाई करण्याचे पत्र ग्रामपंचायतीला देण्यात आले. ग्रामपंचायतीने चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन उपाय योजना न करता मलाईदार कामात लक्ष घालत असल्याची चर्चा आहे.
करडी सुमारे ५ ते ६ हजार लोकसंख्येचे गाव असून व्यापारी पेठ म्हणूनही ओळखली जाते. काही वर्षापूर्वी गावाला हागणदारी मुक्त गावाचा पुरस्कार सुध्दा मिळाला आहे. परंतू गावाची शौचालयाची समस्या अजुनही सुटलेली नाही. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, शेतांमध्ये शौचास जातांना दिसतात. गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा शाळेजवळ बांधलेल्या पाणी पुरवठा योजनेतून होत आहे. दोन वर्षापुर्वी जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सुमारे १६ लाखांचा निधी जि.प. कडून देण्यात आला होता. पाईप लाईनचे काम त्यातून करण्यात आले. परंतु गावात अजूनही जलवाहिनी कमकुवत आहेत. गावातील नाल्या घाणीने माखलेल्या आहेत. घाण स्वच्छ करण्याचे काम ग्रामपंचायतीचे असतांना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप आहे.
जलवाहिनी अनेक ठिकाणी नादुरुस्त आहे. परिणामी नाल्यातील दूषित पाणी जलवाहिनीमध्ये शिरुन पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जंतमिश्रीत दूषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराची मोठ्या प्रमाणात लागन झाली आहे. अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात करडी गावातून यायला लागल्याने करडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावातील विविध भागातून पाण्याचे नमुने घेतले.
पाणी पिण्यासाठी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावातील विविध भागातून पाण्याचे नमुने घेतले असता पाणी पिण्यासाठी अयोग्य आढळून आले. तसा अहवाल त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे दिला. ग्रामपंचायत प्रशासनाने अहवालाची दखल घेत चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. गावात जवळपास १५० ते २०० नागरिक हगवण, उलटी व अन्य आजारांनी त्रस्त असून प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले आहेत. गावातील नाल्या घाणीने बुजलेल्या आहेत. नाल्या स्वच्छ केल्या जात नाही. मागील वेळी सुध्दा गावात दूषित पाण्यामुळे अतिसार व अन्य रोगांची लागण झाली होती. ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. परंतु प्रशासनाने यातून धडा घेतलेला दिसत नाही.
सुमारे १५ ते २० दिवसांपासून गावात २०० लोकांना अतिसाराची लागन झाली आहे. वैद्यकीय अहवाल ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे. नागरिक त्रस्त आहेत. आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असतांना प्रशासन मात्र मलाईदार कामात व्यस्त आहे. (वार्ताहर)
वैद्यकिय अहवाल प्राप्त होताच गावातील पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला. गावातील विहिरीत व शेतातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीत ब्लिचींग पावडर टाकण्यात येऊन पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली. नाल्यातून गेलेल्या जलवाहिन्या लिकेज आहेत. त्यामुळे लिकेज दुरुस्तीचे व दूषित पाण्याचे स्रोत शोधण्याचे काम सुरु आहेत. नव्याने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल.
- युवराज कुथे, ग्रामविकास अधिकारी करडी
करडी गावातील अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने पाण्याचे नमुने विविध ठिकाणावरुन तपासण्यात आले. नमुने दूषित आल्याने तसा अहवाल ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आला. रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
- अंशुल गभणे, वैद्यकीय अधिकारी, करडी