वारपिंडकेपार, मांडवी रेती घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:11+5:302021-01-04T04:29:11+5:30
तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार गाव बावनथडी नदीकाठावर आहे. गावा शेजारूनच बावनथडी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे. रात्री ...
तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार गाव बावनथडी नदीकाठावर आहे. गावा शेजारूनच बावनथडी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे. रात्री येथे यंत्राच्या साहाय्याने नदीपात्रातून रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जातो. मध्य प्रदेशातून रेतीचा उपसा सुरू असला तरी महाराष्ट्राच्या सीमेत रेतीचे उत्खनन केले जात आहे. मध्य प्रदेशामध्ये रेती घाटाचे लिलाव करण्यात आले आहेत. या संधीचा फायदा घेतला जात आहे. दिवसा मध्य प्रदेशाच्या सीमेतून रेतीचे उत्खनन केले जाते, परंतु रात्री येथे महाराष्ट्राच्या सीमेत मोर्चा वळविला जातो. याबाबत महसूल प्रशासन अनभिज्ञ आहे.
बॉक्स
मांडवी येथे प्रकार सुरूच
मांडवी येथून वैनगंगा नदी वाहते. नदीपात्रातून रेतीची चोरी सुरूच आहे. मानवी घाट विस्तीर्ण आहे. येथे मुबलक रेती साठा उपलब्ध आहे. मागील काही दिवसांपासून रेतीचे सर्रास उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. रेती घाट लिलाव नसताना महाराष्ट्राच्या सीमेतून सर्रास रेतीचे उत्खनन होत असल्याने महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
टिप्परची शहरातून वाहतूक
मध्य प्रदेशातील व महाराष्ट्राच्या सीमेतून काढलेल्या रेतीची वाहतूक शहरातून होत आहे. दररोज तुमसर शहरातून अडीशे ते तीनशे टिप्पर शहरातून जातात. शहराला बायपास नसल्यामुळे भरवस्तीतून रहदारीच्या मार्गातून टिप्पर जात असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. टी. पी. असलेल्या टिप्परसोबतच अनधिकृतपणे रेतीच्या टिप्परची वाहतूक होण्याची शक्यता अधिक आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.
फिरत्या पथकाची गरज
अनधिकृत वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्याकरिता महसूल प्रशासनाने फिरत्या पथकाची नियुक्ती करण्याची गरज आहे. गावस्थळापासून तर जिल्हास्तरापर्यंत महसूल प्रशासनाचे जाळे आहे. पुजारी अधिकाऱ्यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आलेली असते, परंतु कारवाई मात्र दिसत नाही. रेतीच्या व्यवसायात अर्थकारण दडले आहे. त्यामुळे कारवाईची शक्यता कमीच दिसते. मध्य प्रदेशाच्या नावाखाली तुमसर व मोहाडी तालुक्यात रेतीचा मोठा व्यवसाय फोफावला आहे. या व्यवसायामुळे अनेकजण गबर झाले आहेत. त्यामुळे त्यांची पानेमुळे खोलवर रुजली आहेत. प्रशासनाने त्यांच्यापुढे नांगी टाकल्याचे चित्र दिसते. कागदी कामात प्रशासन व्यस्त असल्याचा फायदा रेती तस्कर घेताना दिसतात.