जिल्ह्यात आडमार्गाने प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:00 AM2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:01:05+5:30
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरून रेड झोन असलेल्या नागपूर शहरातून अनेक जण विना परवाना आणि लपून-छपून प्रवेश करतात. नागपूरवरून येणारे अनेक जण खरबी नाका चुकवून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे कोरोना प्रादूर्भावाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पद्धतीने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणाºया आणि नियमांचे उल्लंघन करणाºयांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर आले असून रेडझोनमधून चोरून-लपून आडमार्गाने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी दिले आहे. जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली असून अफवा पसरविणाºयांवरही कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले.
भंडारा तालुक्यातील गराडा बुज. येथील एक महिला कोरोनाबाधीत असल्याचे सोमवारी पुढे आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेसंबंधी, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आणि इतर विभागाच्या विभागप्रमुखांची बैठक मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद मोटघरे उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरून रेड झोन असलेल्या नागपूर शहरातून अनेक जण विना परवाना आणि लपून-छपून प्रवेश करतात. नागपूरवरून येणारे अनेक जण खरबी नाका चुकवून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे कोरोना प्रादूर्भावाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पद्धतीने भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणाºया आणि नियमांचे उल्लंघन करणाºयांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मिडीयावर कोरोनाबाबत अफवा व फेक न्यूज पसरविणे गुन्हा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या बैठकीत केला. जिल्ह्यातील नऊ चेकपोस्टवर आता कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करून प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर कलम १४४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गावर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करताना दुकानदार खासगी वाहनातून मालवाहतूक करताना आढळले आहेत. अशा मालवाहतूक करताना दुकानदारांनी परवानाधारक मालवाहतूक वाहनांमधूनच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. किराणा असोसिएशनची बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
औषधांचा मुबलक साठा ठेवा
कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना अंतर्गत खासगी डॉक्टर्स असोसिएशनची बैठक घेऊन चर्चा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आरोग्य यंत्रणेने पीपीई, मास्क, सॅनिटायझरचा मुबलक साठा ठेवावा, कोवीड सेंटरमध्ये सर्व स्टाफची उपस्थिती आवश्यक असून औषधांचा मुबलक साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन औषधांचा तुटवडा भासणार नाही याबाबत त्यांना अवगत करावे असे त्यांनी सांगितले. या बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी कोवीड-१९ च्या नियोजनाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असून गावागावात सर्वेक्षण केले जात आहे. बाहेरगावावरुन येणाऱ्यांवरही करडी नजर आहे.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अपडाऊन बंद
जिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकारी व विविध कार्यालयाचे कर्मचारी आणि बँकांचे कर्मचारी दररोज नागपूर व इतर ठिकाणाहून येणेजाणे करीत होते. मात्र आता कोरोनाचा रुग्ण आढळल्याने या सर्वांना अपडाऊन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नमाज पठन घरातच करावे
सध्या रमजान महिना सुरु असून याबाबत योग्य नियोजन करावे, नमाज पठन घरातच करण्यात यावे, रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.
सर्व परवानग्या रद्द
कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. अशा स्थितीत कोवीड - १९ विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घेऊन जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जीवनावश्यक वस्तूंसह इतर काही दुकाने उघडण्याचे आदेश २० एप्रिल पासून जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र आता रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडता नगरपरिषदामार्फत देण्यात आलेले सर्व दुकानांचे परवाने रद्द करून ही सर्व दुकाने २८ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.