शिक्षकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी

By admin | Published: May 31, 2017 12:37 AM2017-05-31T00:37:04+5:302017-05-31T00:37:04+5:30

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांविरोधात मंगळवारला अविश्वास प्रस्तावावर चर्चा होती.

Action clash between two groups of teachers | शिक्षकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी

शिक्षकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी

Next

प्रकरण अविश्वास प्रस्तावाचे : गायधने यांच्या विरूद्ध १०-० ने ठराव पारित
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांविरोधात मंगळवारला अविश्वास प्रस्तावावर चर्चा होती. याकरिता आलेल्या संचालकांविरुद्ध रोष व्यक्त करून शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी हाणामारी केली. हा प्रकार उपजिल्हा निबंधक कार्यालयात मंगळवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडला. यामुळे तणावाच्या वातावरणात विद्यमान अध्यक्षांविरुद्ध १० विरूद्ध शून्य मताने अविश्वास ठराव पारित करण्यात आला.
भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने यांच्याविरूद्ध हा अविश्वास ठराव पारित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष असलेल्या गायधने यांच्याविरुद्ध त्यांच्याच संघातील पाच संचालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेशी हातमिळवणी केली. अखिलचे पाच व विद्यमान कार्यकारिणीतील पाच अशा दहा संचालकांनी अध्यक्षांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर हे दहाही संचालक पर्यटनवारीवर गेले होते. या दहा संचालकांमध्ये रमेश सिंगनजुडे, शंकर नखाते, रमेश काटेखाये, विजया कोरे, शिवकुमार वैद्य, अनिल गयगये, भैय्यालाल देशमुख, प्रकाश चाचेरे, संजीव बावनकर, यामिनी गिऱ्हेपुंजे यांचा समावेश आहे.
या अविश्वास प्रस्तावावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दुपारी १ वाजता चर्चा आयोजित केली होती. याकरिता पर्यटनवारीवरील हे दहाही संचालक पाच मिनिटांपूर्वी वाहनाने कार्यालय परिसरात दाखल झाले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शेकडो शिक्षकांनी फुटीरवादी संचालकांविरुद्ध घोषणाबाजी केली. यातील काहींनी या संचालकांना पकडून धक्काबुक्की व मारहाण करीत कपडे फाडले. दोन शिक्षक संघटनांच्या राजकीय वर्चस्वाच्या अधिपत्यामुळे हा प्रकार घडला. आक्रमक शिक्षकांच्या तावडीतून संचालकांना कसेबसे बाहेर काढून जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. यानंतर सहाय्यक उपनिबंधक एस.जे. हटवार व सहकार अधिकारी श्रेणी २ चे निलेश जिभकाटे यांच्यापुढे या दहाही संचालकांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली. चर्चेदरम्यान पतसंस्थेचे संचालक रमेश सिंगनजुडे यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आणि त्याला उपस्थित नऊ संचालकांनी अनुमोदन दिले. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह अन्य एक संचालक गैरहजर होते.

५९ वर्षातील पहिली घटना
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची स्थापना झाली. त्यानंतर अध्यक्ष व संचालक मंडळांनी येथे कारभार केला. मात्र अविश्वास प्रस्ताव आल्याने त्याला सामोरे जाताना संचालकांशी घडलेला हा प्रकार पतसंस्थेच्या ५९ वर्षाच्या इतिहासातील पहिलाच आहे.
पोलीस आले अन् निघून गेले
शिक्षकांच्या दोन गटात आज धक्काबुक्की व हाणामारी झाल्याची माहिती निबंधक कार्यालयाने पोलिसांना दिली. मात्र पोलीस तब्बल दीड तासानंतर घटनास्थळी दाखल झाले.हवालदारासह आलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठल्यानंतर अधिकाऱ्यांच्या तोऱ्यात केवळ पाहणी केली व प्रकरण गंभीर वळण घेईल, कदाचित या भीतीने त्यांनी तिथून काढता पाय घेतला. असा प्रकार होईल याची पूर्वसूचना शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी निबंधक कार्यालयाला दिली होती. त्यामुळे अगोदरच पोलीस बंदोबस्त मागण्याची सूचनाही त्यांना केल्यानंतरही कार्यालयाने त्याची दखल घेतली नसल्याचा संताप संचालकांनी व्यक्त केला.

संस्थेच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन शिक्षक बांधवांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात आले. माझ्या कार्यकाळात संस्थेच्या हिताचे काम करून नावलौकिक केले.
- विकास गायधने,
अध्यक्ष, शिक्षक सहकारी पतसंस्था

संचालकांना विश्वासात न घेता विद्यमान अध्यक्षांनी मनमर्जीने कामकाज केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून रोष व्यक्त करण्यात आला.
-रमेश सिंगनजुडे, संचालक तथा जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ

Web Title: Action clash between two groups of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.