वरठीच्या महिला सरपंच झाल्या अपात्र- अपर आयुक्तांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:40+5:302021-05-29T04:26:40+5:30
वरठी येथील सामाजिक कार्यकर्ता बाबुलाल बोन्द्रे यांनी या प्रकरणात अपर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी ...
वरठी येथील सामाजिक कार्यकर्ता बाबुलाल बोन्द्रे यांनी या प्रकरणात अपर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपर आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांच्याकडे प्रकरण दाखल केले. यात सरपंच श्वेता अरविंद येळणे यांनी नियमबाह्य कार्य व शासकीय निधीचा अपहार करून कर्तव्यात कसूर करीत शासनाची दिशाभूल केली, असा ठपका ठेवण्यात आला. धोरणात्मक व विकासात्मक कामे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या विषय सूचीवर न घेता शासन नियमांना डावलून बांधकाम साहित्य व इतर साहित्य खरेदी निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्याचे आरोप चौकशीत सिद्ध झाले. पाणी पुरवठा योजनेत तुरटी खरेदी प्रक्रिया सदोष असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणात दोन्ही पक्षांचे लेखी व मौखिक युक्तिवाद अवलोकन केल्यावर या प्रकरणात सरपंच श्वेता येळणे पदाचा गैरवापर केल्याचा सिद्ध झाले. सरपंच पदावरून अपात्र करण्याचा निर्णय अपर आयुक्तांनी दिला आहे. या निर्णयाने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला असून, राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला १५ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, दावे-प्रतीदाव्यात हे दिवस सुरळीत निघून जातील, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
बॉक्स
न्यायालयात दाद मागणार
तक्रार व चौकशी यात राजकीय सूडबुद्धी व दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणात आलेले निर्णयाचे स्वागत आहे. अपर आयुक्तांचे निर्णय अंतिम नाही. या निर्णयाला न्यायालयात आवाहन देणार आहे. अद्याप निर्णयाची प्रत मिळालेली नाही. पण लवकरच याप्रकरणी न्यायालयात दाद मागून शासन दरबारी न्याय मागणार आहे. आमची राजकीय पार्श्वभूमी नाही त्यामुळे अकारण बळी पडलो आहे. पण पुढील निर्णयात मला नक्की न्याय मिळेल, अशी आशा असल्याची माहिती सरपंच श्वेता येळणे यांनी दिली.