पोलीस कर्मचाऱ्यांच्या ॲक्शन मोडमुळे कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या संख्येवर ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:35 AM2021-05-23T04:35:25+5:302021-05-23T04:35:25+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याची तालुका प्रशासनाने दखल ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याची तालुका प्रशासनाने दखल घेऊन कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लॉकडाऊन कालावधीत कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच नंदू पाटील गहाणे यांच्या मार्गदर्शनात गावातील अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसह भाजीपाला दुकाने बंद ठेवून गावात पूर्णत: आवागमन बंद करण्यात आले. प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात चौकाचौकांत ठेवलेला पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त कोरोनाचा संसर्ग रोखण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. येथे कोणत्याही रुग्णाने घराबाहेर पडू नये आणि इतर घरच्या लोकांनी बाधित रुग्णांपासून कसे वेगळे राहावे याची घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. एवढेच नव्हेतर, पोलिसांनी गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रतिबंध घातल्यामुळे कोरोनाच्या वाढीवर ब्रेक लागला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.