पालिका प्रशासनाची पूर्वसूचना न देता अतिक्रमणाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 02:28 PM2024-05-04T14:28:01+5:302024-05-04T14:28:48+5:30
नागरिकांत संताप : तुमसर शहरातील कुंभारेनगरातील प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर: प्रशासक राजवटीत नगरपालिकेने एकतर्फी कर्तव्य बजावण्याचा सपाटा चालविला की काय ? असे दिसू लागले आहे. दलित वस्तीतून वाहणाऱ्या मुख्य नालीतील गाळ उपसण्याचे काम पालिकेच्या अंगलट आले आहे. नालीतील गाळ उपसायचे सोडून आरोग्य निरीक्षकाने कुंभारेनगरात चक्क अतिक्रमण हटविण्याची अनधिकृत कारवाई केली. यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. ही कारवाई पालिकेने ३० एप्रिल रोजी केली. परिसरातील महिलावर्ग धावून जाताच सफाई कर्मचारी कामाच्या ठिकाणाहून पोबारा झाल्याची माहिती आहे. शहरातील दाट लोकवस्तीत केलेल्या त्या कारवाईमुळे कुंभारेनगरातील मुख्य मार्ग सध्या बंद झाले आहे. काँक्रीटचा मलबा गत ४ दिवसांपासून रस्त्यावर पडून आहे. नाली उपशांची सूचना असताना आरोग्य निरीक्षकाने अतिक्रमण हटविण्याची अनधिकृत कारवाई का केली? कोणी तशी सूचना केली? कुणाच्या दबावात येऊन अधिकाऱ्याने कर्तव्य बजावले? आरोग्य विभागाच्या अधिकार कक्षेत नगर रचनाकार विभागाचे कर्तव्य मोडतात काय? तसे असेल तर पालिकेने स्थानिकांना लेखी सूचना, अथवा पोंगा फिरवून स्थानिकांना अवगत का केले नाही? अशा अनेक प्रश्नांनी सध्या तोंड वर केले आहे. मात्र, या सर्व प्रकारांपासून आरोग्य अभियंता अनभिज्ञ दिसून आले आहेत.
आरोग्य निरीक्षकाची अरेरावी
नाली उपसा करताना घराची तोडफोड केली गेली. त्यावेळी स्थानिकांनी आरोग्य निरीक्षकाला मज्जाव केला. मात्र, महिलांना शिवीगाळ करून सफाई कर्मचाऱ्यांनी चक्क दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने अनधिकृत कारवाई केली.
लेखी सूचना देणे बंधनकारक
कुठलेही अतिक्रमण हटविण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने अतिक्रमणधारकांना शेवटची संधी म्हणून लेखी सूचना करावी लागते; परंतु येथे नगरपालिकेने तसे केलेले नाही. कर्तव्याच्या नावावर कायदा हातात घेणे चुकीचे असून येथे संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकाने कारवाई करावी, अन्यथा स्थानिकांच्या संतापला तडा गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पालिका प्रशासनाची राहील, असा इशाराही माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिला आहे.
वादग्रस्त वक्तव्य
पालिकेला अनधिकृत अतिक्रमण काढण्याचे अधिकार आहेत. तसे करताना अतिक्रमणधारकांना लेखी अथवा मौखिक पूर्वसूचना देणे गरजेचे नाही. तसा कायदा नाही. आरोग्य निरीक्षकाने असे वादग्रस्त वक्तव्य केले असून हे प्रकरण अधिकाऱ्याच्या अंगलट येण्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्य निरीक्षकाने केला अधिकाराचा गैरवापर
पाणी शुद्धीकरण केंद्रातील बँक वॉटरची विल्हेवाट कुंभारेनगरातून पिपरा गावाच्या दिशेने धावणाऱ्या मोठ्या नाल्यातून केली जाते. त्या नाल्यात गाळ साचल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पालिकेने नाली उपसा करायला सुरुवात केली आहे; परंतु असलेले अतिक्रमण आरोग्य निरीक्षकाने पूर्वसूचना न देताच काढत अधिकाराचा गैरवापर केल्याचे येथील रहिवासी संदीप कटकवार यांनी म्हटले आहे.