अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:21 AM2017-11-15T00:21:25+5:302017-11-15T00:21:44+5:30
शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाबाबत पुन्हा ज्वर चढू लागला आहे.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवक
भंडारा : शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाबाबत पुन्हा ज्वर चढू लागला आहे. भंडारा नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे शहरातील त्रिमूर्ती चौक ते शास्त्री चौक मार्गावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. परिणामी रस्त्याच्या दुर्तफा थाटलेल्या दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढायला सुरूवात केली आहे.
वाढत्या नागरीकरणाच्या माध्यमातून शहराची व्याप्तीही वाढू लागली. शहराची लोकसंख्या वाढत असताना त्यामानाने व्यापारी प्रतिष्ठाने झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे पार्किंग व्यवस्था नसलेल्या भंडारा शहरात अतिक्रमणाने गंभीर स्वरूप प्राप्त केले. मागील दोन दशकांपासून रस्त्याच्या कडेला फेरीवाले तथा लघु व्यवसायिकांनी दुकाने थाटले आहेत. शहरातील मुख्य रस्ता आधीच अरूंद असताना त्यातही वाढत्या अतिक्रमणाने समस्येत भर घातली आहे. दुकानात प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. परिणामी अपघाताला आमंत्रण तर मिळतेच याशिवाय वाहतुकीच्या कोंडीला समोरे जावे लागते. दीड लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या भंडारा शहरात अतिक्रमणाची समस्या पालिका प्रशासनासाठी गंभीर समस्या ठरली आहे. दर दोन वर्षांनी अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात येत असली तरी तरी शेकडो लघु व्यावसायिकांची दुकाने उजाडल्यानंतर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही. त्यातही श्रीमंतांना वगळून गरिबांची दुकाने तोडली जातात, असा आरोप कायम आहे. अतिक्रमण करणे हा गुन्हा असला तरी रोजगारअभावी पोट भरणे कसे शक्य आहे, याचे तारतम्य जुळणे आवश्यक आहे.
अशी आहे नोटीस
भंडारा नगर पालिका तथा सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक १ यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमणधारकांना वेगवेगळ्या तारखेला नोटीस बजावण्यात आलेले आहेत. यात भंडारा-तुमसर राज्यमार्गाच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण नोटीस मिळाल्याच्या सात दिवसांच्या आत काढावे, अन्यथा मुंबई महामार्ग अधिनियम कलम २१ अन्वये व महाराष्टÑ नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ व १८९ अंतर्गत कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे करण्यात आल्यास त्याचा खर्चही अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असेही बजावले आहे.
पार्किंग नसलेले शहर
भंडारा शहर कदाचित महाराष्ट्रातील पहिले पार्किंग नसलेले जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असावे. पार्किंगची गरज कुणालाही कशी? कळली नसावी, ही नवलाची बाब आहे. जिल्हा मुख्यालय, शाळा, महाविद्यालये, सर्वच बॅकांच्या शाखा व एटीएम केंद्र भंडारा शहरात आहेत. केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, सात पेट्रोलपंप, मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल्स, सार्वजनिकसह खाजगी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क यासह शकेडो पतसंस्था व बरीच कार्यालये व शेकडो व्यापारी प्रतिष्ठाने व आस्थापना आहेत. मात्र, शहरात कुठेही र्पाकिंगची व्यवस्था नाही.
अतिक्रमणधारकांना नियमाप्रमाणे नोटीस बजावण्यात आलेली आहे. पोलीस दलाचे सहकार्य मिळताच संयुक्तपणे मुख्य मार्गावर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येईल.
- अनिल अढागळे, मुख्याधिकारी, नगरपालिका, भंडारा