जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:09 AM2021-02-28T05:09:13+5:302021-02-28T05:09:13+5:30
भंडारा जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. शनिवारी ११५५ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. ...
भंडारा जिल्ह्यात गत आठवडाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. शनिवारी ११५५ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा तालुक्यात १८, पवनी १०, तुमसर आणि साकोलीत प्रत्येकी दोन तर लाखनीत आठ असे ४० रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात सध्या २३२ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात १११, मोहाडी १४, तुमसर ४८, पवनी १७, लाखनी २७, साकोली १३ आणि लाखांदूर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण गत महिन्यात अधिक असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र गत तीन दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भंडाऱ्यात रुग्णसंख्या कमी असली तरी नागरिक मात्र बेजाबदारपणे वागत असल्याचे दिसत आहे.