आदर्श मोखारा गावाने शंभर टक्के कोविड लसीकरण केले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:57+5:302021-05-01T04:33:57+5:30
आतापर्यंत भारतात करोडो लोकांना लस देण्यात आलेली आहे. या लसीकरणाचा सर्व नागरिकांनी लाभ घेऊन कोरोना या महाभयंकर रोगाला भारतातून ...
आतापर्यंत भारतात करोडो लोकांना लस देण्यात आलेली आहे. या लसीकरणाचा सर्व नागरिकांनी लाभ घेऊन कोरोना या महाभयंकर रोगाला भारतातून हद्दपार करायचे आहे. अशा सूचना वारंवार शासनाकडून देण्यात येत आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोखारा गावात जिल्हा परिषद शाळेत लसीकरण शिबिर ठेवण्यात आले. यात मोखारा येथील ४५ वर्षांवरील सर्व स्त्री, पुरुषांनी लस घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी केले आहे. लसीबाबत कुणीही खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी जास्तीत जास्त लस घेणे गरजेचे आहे. मोठ्या संख्येने लसीकरणाला उपस्थित राहून लसीकरणाचा लाभ घ्यावा, अशा सूचना तहसीलदार नीलिमा रंगारी, खंडविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्या मार्गदर्शनात मोखारा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रीतीताई जितेंद्र नखाते व सर्व सदस्य गण व ग्रामसेवक के.जे. दोनोडे, तलाठी जुमळे , ग्रामपंचायतीचे शिपाई राकेश दिलीप गिरेपुंजे यांनी गावातील प्रत्येकाला लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले. लसीकरणाला आरोग्यसेविका डोंगरे, अंगणवाडी सेविका पुष्पा आडखू नखाते , आशा सेविका सुधा हरिदास नखाते व ग्रामपंचायतीचे आपरेटर हरीश देसाई व अमोल पंचभाई कोतवाल यांनी लसीकरण केले. त्यामुळे आदर्श मोखारा हे गाव भंडारा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पूर्ण लसीकरण करण्यात प्रथम आले आहे. उद्दिष्टे पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी कदम यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.