व्यसनमुक्त युवा पिढी ही देशाची प्रगती
By admin | Published: February 13, 2017 12:24 AM2017-02-13T00:24:35+5:302017-02-13T00:24:35+5:30
व्यसनाच्या आहारी गेल्याने आजची युवा पिढी जीवनातील ध्येयापासून भटकत चालली आहे.
कल्याणी भुरे यांचे प्रतिपादन : मिटेवानी येथे दारुबंदी करणाऱ्या महिलांचा सत्कार
तुमसर : व्यसनाच्या आहारी गेल्याने आजची युवा पिढी जीवनातील ध्येयापासून भटकत चालली आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे पालकांचेही कर्तव्य आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने व जनजागृतीने व्यसनमुक्त युवा पिढी तयार झाल्यास देशाची प्रगतीही निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे यांनी केले.
मिटेवानी गावातील महिलांनी दारुबंदीसाठी बंड पुकारून ते यशस्वी केल्याने त्यांचा सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पं.स. सदस्य मुन्ना फुंडे, सरपंच अनिता राहांगडाले, जि.प. सदस्या मरसकोल्हे, वामन राहांगडाले, आशा काळे मंचावर उपस्थित होत्या. पुढे बोलताना कल्याणी भुरे म्हणाल्या की, आपला मुलगा कुठे जातो, काय करतो, त्याचे सोबती कोण? या सर्व बाबींची माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे आहे. काय वाईट आहे, काय चांगले आहे त्या दुष्परिणाम काय हे पाल्यांना समजावून सांगितल्यास स्वत:ला सावरण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण झाल्यास ते व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत. महिलांनी ज्या प्रकारे संसार उध्वस्त होण्याच्या भीतीपोटी रणरागिनी बनल्या, तसा आत्मविश्वास जागृत ठेवून प्रत्येक क्षेत्रात सहभाग नोंदवून प्रगती भरारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
संचालन व आभार ग्रामसेवकांनी केले. कार्यक्रमात गावातील सर्वच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (शहर प्रतिनिधी)