तंत्रज्ञानाची जोड देत महिला शेतकऱ्याने घेतले भरघोस उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:37 AM2021-05-06T04:37:09+5:302021-05-06T04:37:09+5:30
पालांदूर : शेतीत नवनवे बदल स्वीकारून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी सरसावलेला आहे. कृषी विभागाच्या नव्या तंत्रज्ञानाने व सहकार्याने शेतकरी ...
पालांदूर : शेतीत नवनवे बदल स्वीकारून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी सरसावलेला आहे. कृषी विभागाच्या नव्या तंत्रज्ञानाने व सहकार्याने शेतकरी जिद्दीने उत्पन्न घेत आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत इसापूर (न्याहरवाणी) येथील आचल पद्माकर गिदमारे यांनी तीन एकरांत भाजीपाल्याची उत्तम बागायत सजवलेली आहे. टमाटर, काकडी, चवळी व कारले आदी पिकांचे भरघोस उत्पन्न सुरू आहे. मात्र, कोरोना आड आल्याने बाजार भाव पडलेले आहेत.
भारतीय महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आहेत. शेती क्षेत्रात सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. भाजीपाला शेतीतील पारंपरिक अभ्यास सोबत घेत नव्या तंत्रावर भर देत भरउन्हाळ्यातही शेती फुलवलेली आहे. खरीप हंगामानंतर सगळेच शेतकरी एकाच वेळेस भाजीपाला उत्पादन करतात. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी उन्हाळ्यात भाजीपाला निघेल अशा बेताने लागवड करतात. नेमकी हिच चतुराई साधत आचल गिदमारे यांनी बागायत शेतीचे नियोजन केले. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भाजीपाला काढणीला आला. भाजीपाला थेट भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडीत पोहोचता केला. याच काळात गतवर्षीप्रमाणेच कोरोना आड आला. संचारबंदी घोषित झाली. बाजारात मागणी घटली. मागणी-पुरवठाच्या सूत्राने भाव गडगडले. त्यामुळे उत्साही आचलची नफ्याची आशा धूसर झाली.
तीन एकर जागेत भाजीपाल्याची उत्तम बागायत फुलवलेली आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत बाग सुरेख आहे. विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन सुरू आहे. काकडी, टमाटर, कारले, चवळी व आंतरपीक म्हणून मका सुद्धा लावलेला आहे; परंतु कोरोना संकटाने खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अर्थात नफा अपेक्षित मिळत नाही, अशी खंत आचल पद्माकर गिदमारे
यांनी व्यक्त केली.
कोट
पारंपरिक शेतीला फाटा देत इसापूर येथील आचल गिदमारे यांचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. भाजीपाल्याचे केलेले तंतोतंत नियोजन अभ्यासपूर्ण जाणवले.
गणपती पांडेगावकर, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर