आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:35 AM2019-05-19T00:35:08+5:302019-05-19T00:35:34+5:30
आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तुमसर शहरात आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी सोय म्हणून वसतिगृहाची निर्मिती राज्य शासनाने केली. परंतु गत २० वर्षांपासून आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या खोलीत सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आदिवासी बांधवांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. राज्य व केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तुमसर शहरात आदिवासींच्या मुलांना उच्चशिक्षणासाठी सोय म्हणून वसतिगृहाची निर्मिती राज्य शासनाने केली. परंतु गत २० वर्षांपासून आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या खोलीत सुरु आहे. आतापर्यंत भाड्याच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा झाला आहे.
तुमसर तालुक्यात ४५ गावे आदिवासी बहुल आहेत. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात तो उच्चांक आहे. शहरात आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह १९९९ मध्ये शासनाने सुरु केले. गत २० वर्षापासून ते भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. आतापर्यंत लाखो रुपये भाड्यापोटी देण्यात आले आहे. आठव्या वर्गापासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांची व्यवस्था या वसतिगृहात करण्यात आली आहे. मुलींच्या वसतिगृहाचे काम २०१८ मध्ये पूर्ण झाले. नवीन इमारतीत वसतिगृह हलविण्यात आले. सुमारे ४ कोटींची वसतिगृहाची इमारत शहरातील शासकीय आयटीआय समोर आहे.
दुसरीकडे मुलांचे वसतिगृह भंडारा रोडवरील खापा टोलीत असून त्यासाठी मासिक ५० हजार रुपये भाडे मोजले जात असल्याची माहिती आहे. मुलांच्या वसतिगृहासाठी आदिवासी संघटनांनी अनेकदा आंदोलने केली. परंतु उपयोग झाला नाही. शासनाने येथे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी केला आहे. मुलींच्या वसतिगृहाजवळ मुलांचे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध आहे. परंतु निधी दिला जात नाही. त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण घेताना अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उईके यांनी केला आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण मिळावे यासाठी शासनाच्या विविध योजना आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल गावे आहेत. या गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी तुमसर शहरात येतात. परंतु वसतीगृह भाड्याच्या खोलीत असल्याने तेथे पुरेशा सुविधा मिळत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी आर्थिक भार सहन करून शहरात भाड्याची रूम करून राहतात.
वसतीगृहात सुविधांचाही अभाव दिसून येतो. यासाठी तुमसर येथे आदिवासी मुलांचे वसतीगृह उभारण्याची गरज निर्माण झाली असून लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
ओबीसी मुलींचे वसतिगृह नाही
तुमसर शहरात समाजकल्याण विभागाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह आहे. तेही भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. परंतु मुलींचे वसतिगृह अद्यापही सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे ओबीसींच्या मुलींची शिक्षणासाठी फरफट होत आहे. तुमसर तालुक्याच्या शेवटच्या गावाचे अंतर ४५ किमी आहे.त्यामुळे ये जा करणे मुलींना शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुली आपले शिक्षण अर्ध्यावरच सोडून देतात. तालुक्यातील अनेक गावात हायस्कूलपर्यंतच शाळा आहे. शिक्षणासाठी त्यांनी भंडारा किंवा तुमसरला यावे लागते. अनेक पालक भंडारा शहर दूर पडत असल्याने तुमसरला पसंती देतात. मात्र येथे ओबीसींच्या मुलींसाठी वसतीगृह नसल्याने आर्थिक भार सहन करून रूम भाड्याने घेऊन रहावे लागते. मुलींच्या सुरक्षेची काळजी पालकांना सतावत असते.