‘त्या’शिक्षकाचे समायोेजन रद्द करा
By admin | Published: October 21, 2016 12:18 AM2016-10-21T00:18:29+5:302016-10-21T00:18:29+5:30
भातकुली पंचायत समितीअंतर्गत गणोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रशासनाने केलेल्या चुकीच्या समायोजनामुळे एक शिक्षक अतिरिक्त ठरले आहे
शाळेला ठोकले कुलूप : शिक्षण विभागाची चूक, शिक्षक अतिरिक्त
गणोरी : भातकुली पंचायत समितीअंतर्गत गणोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रशासनाने केलेल्या चुकीच्या समायोजनामुळे एक शिक्षक अतिरिक्त ठरले आहे. याबाबत सीओ, ईओ व बीईओ यांना १० तारखेला निवेदनही देण्यात आले. मात्र, त्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने बुधवारी गावकऱ्यांनी एकत्र ेयेऊन शाळेला कुलूप ठोकले. यापुढेही या मागणीची दखल घेतली न गेल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
२०१५-१६ या शैक्षणिक सत्रात जि.प. शाळेची पटसंख्या ६४ होती. शासन निर्णयानुसार ६४ पटसंख्येवर तीन शिक्षकांची पदे मंजूर होतात. परंतु शिक्षण विभागाने केलेल्या दिरंगाईमुळे सन २०१५-१६ मध्ये ५८ पटसंख्याच दाखविण्यात आल्याने दोनच शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आलीत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याधापकांनी वारंवार दुरस्ती करण्यासंदर्भात तोंडी व लेखी निवेदन देऊनदेखील कार्यवाही करण्यात आली नाही. उलट एक शिक्षक अतिरिक्त ठरवून ज्या शाळेची पटसंख्या २ आहे तेथे त्यांच्या समायोजनाचे आदेशही देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
त्यामुळे अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकाचे समायोजन तत्काळ रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याच मागणीसाठी बुधवारी शाळेला कुलूप ठोकण्यात आले. (वार्ताहर)