अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
By admin | Published: August 15, 2016 12:18 AM2016-08-15T00:18:12+5:302016-08-15T00:18:12+5:30
राज्यातील खासगी संस्थांमधील अनुदानित पदावर कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या सूचना शासनाने यापूर्वी दिलेल्या आहेत.
शिक्षण आयुक्तांचे परिपत्रक : खासगी संस्थांमधील अनुदानित शिक्षकांचा प्रश्न मार्गी
अशोक पारधी पवनी
राज्यातील खासगी संस्थांमधील अनुदानित पदावर कार्यरत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या सूचना शासनाने यापूर्वी दिलेल्या आहेत. त्यानुसार शिक्षण आयुक्त यांचे परिपत्रकानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तीन फेऱ्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या शैक्षणिक सत्रापासून सुरु असलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
खासगी संस्थांकडून संस्थेकडे अनुदानित पदावर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची तसेच संस्थेमधील रिक्त पदांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर भरण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी आवश्यक सूचना शिक्षण आयुक्त यांचे ११ आॅगस्टचे पत्रान्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यानंतरच जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी, जिल्ह्यातील रिक्त पदांनुसार त्या संस्थेचे अनुशेष तपशील व जिल्ह्यातील विषयनिहाय रिक्त पदांची यादी शिक्षणाधिकारी यांचे लॉगिंगला जनरेट होणार आहे. ही यादी प्रसिद्ध करून अतिरिक्त शिक्षकांना त्याची कल्पना द्यावयाची आहे. हरकती, सूचनांसाठी चार दिवसांचा कालावधी दिल्यानंतर अतिरिक्त शिक्षक व रिक्त पदांची यादी अंतिम समजण्यात येईल. त्यानंतर यादीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. यानंतर समायोजनाचे दिवशी जिल्ह्यातील सर्व अतिरिक्त शिक्षक व त्यांचे मुख्याध्यापक, रिक्त पदे असणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांना उपस्थित राहण्याच्या सूचना द्यावयाच्या आहेत.
शासनाने अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाईन समायोजनाची कार्यपद्धती निश्चित करून दिलेली आहे. त्यामुळे समायोजन तीन फेऱ्यांमध्ये पूर्ण करावयाचे आहे.
समायोजनाचे पहिल्या फेरीत जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची त्यांच्या सध्याच्या पदावरील प्रथम नियुक्ती दिनांकापासून सेवाज्येष्ठता यादी तयार होईल. यादीनुसार अतिरिक्त शिक्षकांचा प्रवर्ग व अध्यापनाचा विषय या दोन्ही बाबीनुसार जिल्ह्यातील ज्या संस्थेत सदर प्रवर्गाचा अनुशेष शिल्लक आहे व त्या संस्थेत त्या विषयाची जागा रिक्त असल्यास सदर शाळेची यादी उपलब्ध होईल. संबंधित शिक्षकांनी त्यांच्या सोयीनुसार व पसंतीने शाळा निवडावी. शाळा निवडल्यानंतर सदर शिक्षकाचे समायोजन त्या शाळेत होऊन समायोजनाच्या आदेशाची प्रत आॅनलाईन जनरेट होईल. त्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. जिल्ह्यामध्ये त्याच्या प्रवर्गानुसार विषयाची जागा उपलब्ध नसल्यास सदर शिक्षक पुढील फेरीसाठी पाठविण्यात येईल. ज्या अतिरिक्त शिक्षकांचे प्रथम फेरीत समायोजन होऊ शकणार नाही अशा शिक्षकांना त्यांच्या अध्यापनाच्या विषयानुसार सर्वसाधारण प्रवर्गातील रिक्त पदानुसार रिक्त जागांची यादी उपलब्ध होईल. संबंधित शिक्षकाने त्याच्या सोयीनुसार व आवडीनुसार पसंतीने शाळा निवडावी. समायोजनाच्या आदेशाची प्रत आॅनलाईन जनरेट होईल. त्यानंतर बदल करता येणार नाही. शिक्षकांसाठी जिल्ह्यामध्ये त्याच्या विषयाची जागा उपलब्ध नसल्यास सदर शिक्षक पुढील फेरीसाठी पाठविण्यात येईल. अशा शिक्षकांना त्याच्या प्रवर्गाचा विचार न करता अध्यापनाच्या विषयानुसार त्यांच्या सोयीनुसार व पसंतीने शाळा निवडावी.
समायोजनाचे आदेशाची प्रत प्राप्त होईल. त्यामध्ये बदल होणार नाही. सदर शिक्षकासाठी जिल्ह्यामध्ये त्याच्या विषयाची जागा उपलब्ध नसल्यास सदर शिक्षकाचे नाव विभागस्तरावर शिक्षण उपसंचालक यांच्याकडे समायोजनासाठी पाठविण्यात येणार आहे. १६ आॅगस्टपासून सुरु होणारी प्रक्रिया समायोजनाने २५ आॅगस्ट रोजी पूर्ण होणार आहे.
शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी
अतिरिक्त शिक्षकांचे संस्थांतर्गत समायोजन झाल्यानंतर सर्व शाळांमधील पदांची व त्यावर कार्यरत शिक्षकांची माहिती १०० टक्के भरल्याची खात्री शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी करावयाची आहे. रिक्त पदांची माहिती भरल्या गेल्याची माहिती जिल्ह्याच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाकडून स्वतंत्रपणे घ्यावयाची आहे. माहितीमध्ये त्रृटी असल्यास किंवा संस्था जाणीवपूर्वक माहिती भरण्यास टाळाटाळ करीत असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी अतिरिक्त व रिक्त पदाची माहिती भरावी. माहितीची खात्री करून प्रमाणपत्र - १ ची नमुना अपलोड करावयाचा आहे.