प्रशासनाची ‘डाळ’ शिजेना!
By admin | Published: November 17, 2015 12:33 AM2015-11-17T00:33:20+5:302015-11-17T00:33:20+5:30
महागाई आज ना उद्या कमी होईल, या अपेक्षेत असलेल्या लोकांची निराशा सुरूच आहे. सणासुदीच्या काळात याची तीव्रता अधिकच वाढली.
मार्चपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा : गावरान डाळही महागच, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ
भंडारा : महागाई आज ना उद्या कमी होईल, या अपेक्षेत असलेल्या लोकांची निराशा सुरूच आहे. सणासुदीच्या काळात याची तीव्रता अधिकच वाढली. ग्राहकांनी आयात केलेल्या तूर डाळीकडे जवळपास कानाडोळा केला, तर दुसरीकडे गावरान तूर डाळीचे दर आकाशाला भिडले आहेत. चांगल्या प्रतिची तूर डाळ शंभर रूपयात मिळण्याची शक्यता मावळली आहे. दिवाळी संपली, परंतु स्वस्त डाळीचा अजूनही पत्ता नाही.
मार्च-एप्रिलपर्यंत प्रतीक्षा
मागीलवर्षी आयात करण्यात आलेल्या डाळीची किंमत ७० ते ८० रुपये किलो होती. यंदा हीच किंमत प्रति किलो १२० ते १२५ रुपये इतकी आहे. गावराणी तूरडाळीची किंमत ८०-९० रुपये प्रति किलोपासून १३०-१४० रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे बाजारातील किमती वाढलेल्या आहेत.
२०१६ मधील मार्च-एप्रिलमध्ये डाळीचे नवे उत्पादन झाल्यावरच या स्थितीत सुधारणा होऊ शकते, अशी माहिती आहे. स्थानिक थोक दुकानांमध्ये चांगल्या दर्जाची डाळ १७० ते १८० रुपये किलो होती. मध्यम दर्जाची गावराणी डाळ १४५ ते १५० रुपये किलो तर आयात करण्यात आलेल्या निम्न दर्जाच्या डाळीची किंमत ११० ते १२० रुपये किलो होती.
किराणा व्यापारी आनंदराव चरडे यांनी सांगितले की, तूर डाळ आणि चणा डाळीचे भाव कमी झाले आहेत. शासनाने डाळीवर लावलेला आयात कर हटविल्यामुळे आणि देशाच्या काही राज्यातून तूर डाळीची आवक करण्यात आली. चांगल्या दर्जाची तूरडाळ (फटका) १४० ते १६० रूपये आणि तूरडाळ (फोड) १२० ते १३५ रूपये प्रतिकिलोच्या दराने विकली जात आहे. चणाडाळही ६० ते ६५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. आयातीत तूर डाळीचे भाव ११५ रूपयांवरून १०३ रूपयांवर पोहोचले आहेत.
आयात डाळीकडे ग्राहकांची पाठ
तूर डाळ आणि चणा डाळीचे दर वाढल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले होते. डाळीचे साठे करणाऱ्यांवर प्रशासनाने धाडी टाकून मोठ्या प्रमाणात डाळ आणि सोयाबीन जप्त केले. डाळ मिलर्ससोबत मिळून स्वस्त डाळ ग्राहकांना पुरविण्यात येऊ लागली. यापुढे डाळीचे भाव कमी होतील, असा प्रशासनाचा दावा होता. परंतु सत्यस्थिती यापेक्षा उलट असून गावरान तूर डाळ १६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. याबाबत प्रशासनाने चुप्पी साधली असून डाळीचे भाव कमी होणार असल्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गतवर्षीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंचे दर दुप्पट
मागीलवर्षीच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहे. दिवाळीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली. शासनातर्फे महागाई आटोक्यात आणण्याबाबत दावे केले जात असताना लोकमत प्रतिनिधीने बाजारात जाऊन महागाईचा आढावा घेतला. दिवाळीच्या फराळापासून खास सणांसाठी केल्या जाणाऱ्या पक्वान्नांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती मागीलवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले.