शिवलालच्या भूखंडाची मागणी प्रशासनाने ठेवली ‘वेटिंग'वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:10 PM2019-06-28T22:10:41+5:302019-06-28T22:10:58+5:30
घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : घेराव, उपोषण मोर्चा ही आयुध वापरली गेली. ३७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला. तरीही प्रशासनाने पुन्हा एकदा शिवलालच्या प्लॉटसाठी आश्वासनाच्या वेटिंगवर ठेवले आहे. प्रशासन आपले आश्वासन पाळणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिरसोली येथील शिवलाल लिल्हारेचे घर पाडून महिना झाला आहे. तहसीलदार यांना घेराव, शिवलालच्या मुलांचे उपोषण, जनाक्रोश मोर्चा यांचा वापर केला गेला. तसेच तहसीलदार व सिरसोलीच्या सरपंचानी एकूण ३७ जणांवर गुन्हे दाखल करुन पोलिसांनी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिवलालला त्याच जागचा घरासाठी पट्टा मिळावा व अन्य मागण्यासाठी सत्ता पक्ष सोडून लढाई सुरु केली. तथापि, प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना आश्वासनाच्या जालीम उपायावर एक महिन्यापासून थोपवून ठेवले आहे.
प्रशासन आश्वासनाचा अस्त्र वापरुन आंदोलनाची धार बोथड करण्याचा डाव खेळत असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांना घेराव घातले गेले. अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला. हा सगळा प्रकार एका राजकीय नेत्याच्या सुपीक डोक्यातून झाल्याची जाहिर चर्चा होत आहे. तसेच सिरसोलीचे प्रकरण आश्वासनाच्या लांबणीवर टाकण्याचा कंट्रोल त्याच नेत्याच्या हातातून केला जातोय याची चर्चा अनेकजण करीत आहेत. विरोधकांनी शिवलालला हक्क मिळवून देण्यासाठी जनाक्रोश मोर्च्याची मजबूत मोट बांधली. पण प्रशासनाने पून्हा एकदा आश्वासन देवून आंदोलनकर्त्यांना निर्णयासाठी वेटिंगवर ठेवले आहे.
या मोर्च्यात काँग्रेसचे राष्टÑीय नेते नाना पटोले यांची एंट्री महत्वाची मानली जाते. त्यांनी मोर्च्यात सहभाग घेतल्याने स्थानिक पुढाऱ्यांना शक्ती मिळाली. मोर्च्यात नाना पटोले यांनी तात्काळ निर्णय घेत नसाल तर मी रस्त्यावर येतो अशा इशारा देताच उपविभागीय अधिकारी हादरले. त्यांनी तात्काळ २९ जूनपर्यंत शिवलालला प्लॉट देण्याची कार्यवाही करतो असे लेखी आश्वासन दिले. पण इकडे आश्वासन देणारे अधिकारी किती खोटारडे आहेत असे संतापल्या सिरसोलीच्या महिलांनी नाना पटोले यांना सांगितले. नाना पटोलेनी, त्या महिलांना अवंतीबाई संबोधून, शब्द दिला, २९ तारीख प्रशासनाची पुढची तारीख नानांची असेल. जिल्ह्यात आंदोलन पेटवलं जाईल अशा जाहिर इशारा नाना पटोले यांनी प्रशानाला दिला आहे.
आता शिवलालसह सगळ्या मोहाडीवासीयांचे लक्ष २९ जूनच्या तारखेकडे लागले आहे. प्रशासन आपले आश्वासन पूर्ण करेल काय, यावर आधीच शंका निर्माण होत आहेत. तरीही हे प्रकरण निस्तारायचे की वाढवायचे हे प्रशासनाच्या हाती आहे.