शहरातील धोकादायक टॉवरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:00:22+5:30
मोबाईल ही आजच्या काळात गरजेची व अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र ही भ्रमणध्वनीसेवा पुरविण्यासाठी उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर नागरिक व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात सध्याच्या घडीला २० ते २५ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराच्या विविध भागात असणारे मोबाईल टॉवर अनेक वर्षांपासून उभे आहेत. याकडे विविध कंपन्यांचे देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात अपघात होण्याची भीती आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचेही दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रार करुन देखील याकडे कानाडोळा केला जात असल्याने एखादी मोठी जीवितहानीची घटना घडण्याची भीती नागरिकातून वर्तविली जात आहे.
मोबाईल ही आजच्या काळात गरजेची व अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र ही भ्रमणध्वनीसेवा पुरविण्यासाठी उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर नागरिक व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात सध्याच्या घडीला २० ते २५ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. गतवर्षी पर्यावरणप्रेमींसह व जागरुक नागरिकांनी पाठपुरावा करून मोबाईल टॉवर उभारणीला प्रचंड विरोध केला. मात्र हा विरोध न जुमानता टॉवरची भर घातली आहे. मेंढा (खांबतलाव) खात रोड, कस्तुरबा गांधी वार्ड, साई मंदिर रोड या भागात टॉवर उभारण्यात आले. त्याचबरोबर शहराच्या मधोमध असलेल्या कापड बाजार चौकातील टॉवर येथे सुध्दा मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. या टॉवरला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे.
गत दहा ते अकरा वर्षात मोबाईल टॉवर्सने शहराला विळखा घातला आहे. तरीदेखील भ्रमणध्वनीची सेवा सुरळीतपणे देताना दिसत नाहीत. टॉवर उभारणे गरजेचे आहे. परंतू टॉवर उभारतांना महत्वाच्या अटी व निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. मानवी जीवांसह पशुपक्षी व पर्यावरणावर मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या घातक लहरींचा परिणाम होत असल्याची बाब सर्वज्ञात आहे. त्यामुळे असे टॉवर गावाबाहेर किंवा दाट लोकवस्ती नसलेल्या भागात उभारणे गरजेचे आहे.
या क्षेत्रात काम करणाºया अनेक खाजगी कंपन्या आपल्या सोयीसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून मोबाईल टॉवर उभारत आहत. ज्यांच्या मालकीच्या जागेत या इमारतीत टॉवर लावले जाते त्यांना चांगला मोबदला मिळतो. मात्र त्यामुळे इतरांचा विचार न करता इमारती व जागा भाड्याने दिल्या जात आहेत. टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानूसार नगर पालीकेची परवानगी आवश्यक असते. परंतू शहरातील अनेक टॉवर हे बेकायदेशिर उभे आहेत. इमारतीवर टॉवर उभारण्यासाठी इमारतीच्या मालकाला दरमहा दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत भाडे मिळते. सर्व निकषांची पूर्तता करुनच टॉवरसाठी प्रशासनाकडून अनुमती दिली जाते मात्र काही ठिकाणी याला अपवाद दिसून येत आहे. शहरातील मोबाईल टॉवर हे नगरपरिषदेबंतर्गत येत असल्याने शहरात किती टॉवर आहेत त्यांची परवानगी घेतली किंवा नाही, किती अधिकृत व किती अनाधिकृत याचे रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. प्राप्त माहितीनूसार अनाधिकृत टॉवरचीच संख्या शहरात जास्त असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाच्या पुढाकाराची गरज
नगर परिषद प्रशासनाने शहरात असणाऱ्या टॉवरची संख्या तसेच त्यांची देखभाल दुरुस्ती होत असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. टॉवरच्या वाढत्या संख्येमुळे अनेक पशुपक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. टॉवरची संख्या वाढली असताना देखील नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.