दाखला न घेता प्रवेश, मात्र संच मान्यतेसाठी आधाराची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:48+5:302021-09-15T04:40:48+5:30
मोहाडी : शाळेचा दाखला नसेल तर प्रवेश देण्यात यावा, असे परिपत्रक काढले. मात्र आधार असलाच पाहिजे अन्यथा ...
मोहाडी : शाळेचा दाखला नसेल तर प्रवेश देण्यात यावा, असे परिपत्रक काढले. मात्र आधार असलाच पाहिजे अन्यथा त्या विद्यार्थ्याला संच मान्यतेत जागा राहणार नाही अशा आशयाचे पत्र शिक्षण संचालक, पुणे यांनी काढले. ते पत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघाने केली आहे.
मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष गोपाल बुरडे, सचिव राजू भोयर यांच्या नेतृत्वात मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना जिल्हा कार्यकारी सदस्य सुनीता तोडकर, अतुल बारई, दिगांबर राठोड, विनोद नवदेवे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव राजू बांते आदी उपस्थित होते. पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम शाळांच्या व्यवस्थापनांनी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावे, असे सुचविले आहे. तसेच यापुढे संचमान्यतामध्ये केवळ आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार असल्याचे पत्रात नमूद आहे.
शासनाने अध्यादेश काढून माध्यमिक शाळांमध्ये संचमान्यता करीत असताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सक्तीचे केले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधार अपलोड केले नसतील त्या विद्यार्थ्यांना संचमान्यतेमध्ये गृहीत धरू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होतील. करिता संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांचे आधारकार्डचा निर्णय रद्द करण्यात यावा. शिक्षण संचालक यांच्या पत्रानुसार कार्यवाही झाली, तर शिक्षकांवर संकट येईल. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करणे अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी उपलब्ध होतील. शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आहे.
शाळांचे नुकसान होईल
एकीकडे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे दाखला न देता शाळांमध्ये प्रवेश द्या, असे शासन म्हणते आणि दुसरीकडे त्याला आधारकार्ड सक्ती करण्यात येत आहेत . वास्तविक आधार कार्ड काढणे हे विद्यार्थ्यांची व पालकांची जबाबदारी आहे. त्यामुळे संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अट रद्द करण्यात यावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे.
140921\img_20210914_155615.jpg
दाखला न घेता प्रवेश,मात्र संच मान्यतेसाठी आधाराची सक्ती
निवेदन : आधार नोंदणीची अट रद्द करा