अड्याळ गाव तसे चांगले, पण समस्यांनी वेढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:42 AM2021-08-18T04:42:02+5:302021-08-18T04:42:02+5:30
अड्याळ : गावातील समस्या काही नवीन नाहीत. अनेक वर्षे झाली, अनेक ग्रामपंचायत प्रशासन आले आणि गेलेत, परंतु गावातील ज्या ...
अड्याळ : गावातील समस्या काही नवीन नाहीत. अनेक वर्षे झाली, अनेक ग्रामपंचायत प्रशासन आले आणि गेलेत, परंतु गावातील ज्या अति महत्त्वाच्या समस्या आहेत, त्या आजही सुटलेल्या तर नाहीतच, पण उलट गावातील विविध समस्यांत वाढही झाली आहे.
अड्याळ ग्रामवासीयांनी १३ ऑगस्ट रोजी गुजरी चौकातील मुन्ना हॉल येथे बैठक घेतली. त्यात १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरले आहे. त्यात माजी शिक्षण राज्यमंत्री यांच्यासोबत एक शिष्टमंडळ जाणार आहे. या बैठकीत माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार, डॉ. उल्हास हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, राजेंद्र ब्राम्हाणकर, नंदलाल मेश्राम, मुनिश्वर बोदलकर तंटामुक्त समिती अध्यक्ष, नितीन वर्गांटीवर, अमोल उराडे, आशिक नैतामे, कमलेश जाधव, शुभांगी पवार, ताराबाई कुंभलकर आदी महिला, पुरुष वर्ग तथा युवक मंडळी गावसमस्या चर्चेत उपस्थित होती.
गावातील पथदिवे गेल्या दीड महिन्यापासून बंद, गावात अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, गावातील तथा गावाबाहेर स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण, नायब तहसील कार्यालय आहे, तसेच ग्रामविकास अधिकारी ठरलेल्या दिवसात सुद्धा वेळेवर येत नाही, पण पूर्णवेळही ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी लाभला नाही. गावात पाणीपुरवठा होणाऱ्या पंप हाऊसमध्ये कर्मचाऱ्यांना अद्याप क्वार्टर बांधून मिळाले नाहीत वा जमीनही मिळाली नाही. तसेच गावातील ले आऊटमधील ग्रामपंचायतीला मिळालेले प्लॉट सुद्धा ग्रामपंचायतीच्या नावावर तर झाले नाहीतच, पण लाखोंची नळ योजना, तिलाही ग्रहण लागले आहे. तसेच आजपर्यंत येथील बसस्थानकाचा प्रश्न... अशा विविध समस्यांनी येथील ग्रामस्थ त्रस्त आहेत. यासाठी माजी शिक्षण राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अड्याळ येथील एक पाचसदस्यीय शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती आहे.