‘ए माय, मीबी एतो पेंड्या फेकाले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:22+5:302021-07-18T04:25:22+5:30
अड्याळ : ‘शाळा कधी सुरू होयल, का माहीत. म्या, माया लहान भाऊ रिकाम असल्यान मायसंग वावरात जातो. पण माय ...
अड्याळ : ‘शाळा कधी सुरू होयल, का माहीत. म्या, माया लहान भाऊ रिकाम असल्यान मायसंग वावरात जातो. पण माय काई येवू देत नाही. माय वावराकडे गेली की आम्ही बी तिच्या माग माग जायले लागलं की तिले ‘ए माय, मीबी एतो पेंड्या फेकाले’ असा रटाव लागते. कवा जाऊन माय वावरात येवू देते....’ ग्रामीण भागात आजही शेतीवरच प्रपंच चालतो. हाताला काम नाही. शाळा तर सुरू होईलच; पण तोपावेतो घरात बसण्यापेक्षा आपल्याच शेतात दोन कामे केली तर त्याचा फायदाच होईल, अशी कल्पना कदाचित या चिमुकल्यांना असावी. कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन सर्वांनीच अनुभवले. यातून शेतीला मुभा असल्याने विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले पिढ्यान्पिढ्यांचे उपजीविकेचे साधन असलेल्या शेतीच्या कामात दंग आहेत. अडयाळ येथील शेतातील चिखलात मोठी कसरत करीत भातपिकाच्या पेंढ्या नेणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा जाणवत नाही वा कंटाळाही जाणवत नाही.
बॉक्स
कोरोनाकाळात स्थिती बिकट
दीड वर्षात सतत कोरोनाचा मार सहन करता-करता विशेषतः ग्रामीण भागातील आर्थिक तथा शैक्षणिक परिस्थिती बिकट झाली. ही परिस्थिती पुन्हा भरून काढण्यासाठी तारेवरची कसरत केल्याशिवाय ग्रामस्थांजवळ दुसरा पर्याय उरला नाही. ग्रामीण भागातील लहान मुले घरच्या शेतावर जमेल ते काम करताना दिसतात. अडयाळ किटाळी मार्गावर असणाऱ्या शेतात बालके कुटुंबीयांसोबत काम करताना दिसतात. घरची आर्थिक वा मानसिक स्थितीसुद्धा बिकटच होत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक कामात ही मुले मदत करताना दिसत आहेत.