‘एरोस्केटोबॉल’चा लवकरच होणार शालेय खेळात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:41 AM2021-09-14T04:41:12+5:302021-09-14T04:41:12+5:30
भंडारा : एरोस्केटोबॉल या खेळाची सुरुवात भारतातून झाली आहे. या खेळाचा उगम २०१६ साली भारतातच झाला. हा खेळ भारतातील ...
भंडारा : एरोस्केटोबॉल या खेळाची सुरुवात भारतातून झाली आहे. या खेळाचा उगम २०१६ साली भारतातच झाला. हा खेळ भारतातील विविध राज्यांत मागील पाच वर्षांपासून खेळला जात असून, हा खेळ ‘बॉल गेम व स्केटिंग’ या खेळांचे संमिश्र स्वरूप आहे. या खेळाचा प्रसार व प्रचार बघून ‘स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया’ हा खेळ लवकरच शालेय स्तरात समाविष्ट करण्याबद्दल विचार करीत आहे. याबाबत विविध राज्यांतील प्रशिक्षणार्थ्यांची निवड करून प्रशिक्षण देण्याचे कार्यही सुरू झाले आहे. एरोस्केटोबॉल राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने अजिंक्यपददेखील पटकावले आहे. हा खेळ भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, आसाम, ओडिशा, पाँडेचरी या राज्यांमध्ये खेळला जातो. या राज्यामध्ये एरोस्केटोबॉल असोसिएशनची स्थापनाही करण्यात आली आहे.
खेळ अधिक प्रचलित करून पुढे नेण्याचे व लहान मुलांना हा खेळ शिकविण्याचे काम सध्या सुरू आहे. या खेळाचा प्रसार व प्रचार बघूनच स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाने हा खेळ लवकरच शालेय खेळांमध्ये समाविष्ट करण्याबद्दल विचार केला. या हेतूने फेडरेशनतर्फ १३ सप्टेंबर २०२१ पासून तीन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षणही सुरू केले आहे. या प्रशिक्षणात प्रत्येक राज्यांतून दोन प्रतिनिधी सहभागी करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने हा खेळ कसा खेळला जातो, यात किती खेळाडू असावेत, हा खेळ खेळण्यासाठी कोणकोणत्या साधनांची आवश्यकता असते, मैदानाचे मोजमाप आणि पंच व त्यांची कामे तसेच गुणपत्रिका कशा प्रकारे भरली जाते व एरोस्केटोबॉल या खेळांचे नियम सांगण्यात येणार आहेत. लवकरच हा खेळ शालेय खेळांमध्ये समाविष्ट होऊन संपूर्ण भारतभर विविध शाळेतील मुलांना खेळता येईल.
बॉक्स
असा खेळला जातो एरोस्केटोबॉल
हा खेळ भारताव्यतिरिक्त बांगलादेश, नेपाळ, भूतान, फिनलँड, पोलंड, चीन, जपान, रशिया या देशांमध्येदेखील खेळला जातो. यात खेळण्याकरिता स्केटिंग, बॉल, एरोफ्रेम व मैदान यांची आवश्यकता असते. यात प्रत्येकी एका बाजूला १२ खेळाडू असतात. बॉल हा हवेतच खिळवून ठेवला जातो. बॉल जमिनीवर पडल्यास फाऊल होतो, असे या खेळाचे स्वरूप आहे.
हा खेळ महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत म्हणजे ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, बुलडाणा, रत्नागिरी, औरंगाबाद, बीड, परभणी या जिल्ह्यांत खेळला जातो.
कोट बॉक्स
भारतातून उगम पावलेल्या एरोस्केटोबॉल या खेळाची महती दिवसागणिक वाढत आहे. याची दखल स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाने घेतली आहे. फेडरेशनची मंजुरी मिळताच भारतातील राज्यपातळीवरील सर्वच शिक्षण संचालकांना हा खेळ शालेय स्तरावर सुरू करण्याबाबतचे पत्र (आदेश) निर्गमित करण्यात येतील.
- सुनील क्वाड्रस, अध्यक्ष, एरोस्केटोबॉल, इंडिया.