२२ दिवसानंतर काही आरोपी फरारच
By admin | Published: September 3, 2015 12:25 AM2015-09-03T00:25:55+5:302015-09-03T00:25:55+5:30
राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सहभागी आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांचे एक पथक बुधवारी रवाना झाल्याचे समजते.
तुमसर पोलिसांचे पथक रवाना : नगरसेवक प्रशांत उके हत्या प्रकरण
तुमसर : राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. यातील सहभागी आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांचे एक पथक बुधवारी रवाना झाल्याचे समजते. १२ आॅगस्ट रोजी हल्ला झाला होता. या प्रकरणातील पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले. जखमी स्थितीत नगरसेवकाने पोलिसांना ८ ते १० आरोपींची नावे सांगितली होती. उर्वरित आरोपींना अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर १२ आॅगस्ट रोजी प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणातील ५ आरोपींना पोलिसांनी नागपुरातून अटक केली. २४ तासात दोन व उर्वरीत तीन आरोपींना दोन दिवसात ताब्यात घेण्यात आले. दि. २१ आॅगस्ट पर्यंत या आरोपींची तुमसर पोलिसांनी पोलीस कोठडी घेतली होती. २२ आॅगस्टला त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर नागपुरात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा ३१ आॅगस्टला मृत्यू झाला. दि. १ सप्टेंबरला राकाँसह सर्वपक्षीय नगरसेवक न.प. अध्यक्षांनी तुमसर पोलिसांना सहभागी आरोपींना अटक करण्याची मागणी केली. जखमी स्थितीत खुद्द प्रशांत उके यांनी आरोपींची नावे सांगितली होती हे विशेष. पोलीस प्रशासनाने उर्वरीत सहभागी आरोपींचा का शोध घेतला नाही हा मुख्य प्रश्न आहे. संशयीत म्हणून तरी त्यांना ताब्यात घेण्याची गरज होती असे बोलल्या जात आहे. जखमी अथवा मृत्यपूर्व बयाण हा मोठा आधार अशा खटल्यात मानला जातो. राकाँच्या शिष्टमंडळाने निवेदन देताच तुमसर पोलिसांचे एक पथक रवाना झाले हे न उलगडणारे कोडेच आहे.
हल्ल्याच्या २२ दिवसानंतर पुन्हा सहभागी आरोपींचा शोध घेण्याकरिा पोलीस कामाला लागली. अशा हल्ल्यात निश्चितच मास्टरमार्ईंड असतो. संपूर्ण आरोपींची एकाचवेळी चौकशी व ओळख परेडमुळे बिंग फुटण्याची शक्यता अधिक असते. २२ दिवसानंतर आरोपी मोकाट असल्याने उके कुटुंबियांना धोक्याची शक्यता आहे. या बाबीकडे पोलिसांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. नगरसेवक प्रशांत उके यांचे अस्थिकलश बुधवारी कोष्टी (वैनगंगा) घाटावर विसर्जीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)