५४ दिवसानंतरही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत

By admin | Published: August 21, 2016 12:29 AM2016-08-21T00:29:35+5:302016-08-21T00:29:35+5:30

विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत.

After 54 days, students wait for books | ५४ दिवसानंतरही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत

५४ दिवसानंतरही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत

Next

सर्व शिक्षा अभियानाचा फज्जा : विद्यार्थी शैक्षणिक सुविधेपासून वंचित, पालकांमध्ये असंतोष
विशाल रणदिवे अड्याळ
विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता वाढावी व त्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविल्या जाते. मात्र ५४ दिवसाच्या शैक्षणिक सत्रात अड्याळ येथील विद्यार्थी पुस्तकाच्या प्रतिक्षेत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात आहे. यावर राज्य शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तक वितरीत करावे, असे निर्बंध घातले आहे. यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती संस्थेकडून उन्हाळ्यातच शिक्षण विभागाला पुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळा सुरू होण्यापुर्वी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून संबंधित पंचायत समिती व तिथून शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
पुस्तके मिळाली असली तरी अनेक विषयांचे पुस्तके कमी प्रमाणात पाठविल्याने अनेकांना अद्यापही पुस्तकांचा पुर्ण संग्रह मिळालेला नाही. अनेक विद्यार्थी पुस्तकापासून वंचित असल्याने शैक्षणिक सत्र सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही त्यांना शाळेत अन्य विषयाचे अभ्यासक्रम हाताळावे लागत आहे.
अनेक शाळांमध्ये पहिल्या सत्रातील चाचण्या सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांकडे पुस्तक उपलब्ध नसल्याने अनेकांची शैक्षणिक बोळवण होत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. याबाबत शिक्षण विभागाला विचारणा केली असता त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला माहिती दिली असून त्यांच्याकडून वेळेत पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. शिवसेना तालुका प्रमुख राजु ब्राम्हणकर व ग्रामपंचायत सदस्य महेश गभने यांनी पुस्तकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षण विभागाने त्वरीत पुस्तकांचे वाटप करावे, अशी मागणी केली आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी बाजारपेठेत पुस्तकांची पाहणी केली मात्र तिथेही पुस्तक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविली जातात. दरम्यान अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय, अड्याळ विद्यालय अड्याळ, प्रकाश विद्यालय अड्याळ व विवेकानंद विद्या भवन विद्यालय अड्याळ या चार विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळा सुरू होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतिक्षेत आजही आहेत. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांना पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वळती करण्यात आली. मात्र पुस्तक कधी उपलब्ध होईल, याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. मात्र ५४ दिवसांच्या कालावधीनंतरही पुस्तके अप्राप्त असल्याने यालाच सर्व शिक्षा अभियान म्हणायचे काय? असा संतप्त प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

आमच्याकडे जेवढी पुस्तके पुरविण्यात आली त्या सर्व पुस्तकांचा शाळांना पुरवठा करण्यात आला. अतिरिक्त पुस्तकांची मागणी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.
-एन. टी. टिचकुले, गटशिक्षणाधिकारी पवनी.
पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. परंतु पुस्तकच उपलब्ध झालेले नाही. पुस्तके प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येईल.
-के. डी. भुरे, विस्तार अधिकारी, पवनी.
शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पुस्तक मिळावी यासाठी वारंवार मागणी करण्यात आली आहे. पुस्तक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
-व्ही. एस. जगनाडे, मुख्याध्यापक विवेकानंद विद्यालय अड्याळ.

Web Title: After 54 days, students wait for books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.