अखेर उपोषणकर्त्यांसमोर झुकले प्रशासन
By admin | Published: December 20, 2014 12:40 AM2014-12-20T00:40:31+5:302014-12-20T00:40:31+5:30
तालुका प्रशासनाने शासनाला सादर केलेले पैसेवारी चूकीची असल्याचा आरोप करीत त्यात सुधारणा करण्याचा आग्रह आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनावर भोवला.
लाखांदूर : तालुका प्रशासनाने शासनाला सादर केलेले पैसेवारी चूकीची असल्याचा आरोप करीत त्यात सुधारणा करण्याचा आग्रह आमरण उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनावर भोवला. अगदी एका दिवसात नजरअंदाज आणेवारी ६५ टक्क्यावरुन ४८ टक्के असल्याचे शासनाला पत्र पाठविल्यानंतरच उपोषणाची सांगता झाली. उपोषण कर्त्यापुढे प्रशासन झुकल्याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे.
शासनाला तालुक्याची प्रयोगानुसार पैसेवारी दरवर्षी पाठवावी लागले. यंदा तालुका प्रशासनाने पाठवलेली पैसेवारी ही खोटी असून कोणत्या आधारावर आणेवारी काढली म्हणून त्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी तहसिल कार्यालयापुढे १६ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरु केले होते.
तालुक्यातील ३० गावांचा पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे सांगून तथा अहवाल शासनाला सादर करण्याचा आग्रह करण्यात आला. परंतु प्रशासनाने उपोषणकर्त्यांची योग्य दखल न घेतल्याने अखेर १८ डिसेंबरला रास्ता रोको करण्याचा निर्णय शेतकऱ्यानी घेतल्यानंतर प्रशासन जागे झाले. तात्काळ उपोषण कर्त्यांसोबत तहसिलदार विजय पवार यांनी पोलिस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी यांचे सहकार्याने चर्चा घडवून आली.
तत्पूर्वी तहसिलदार व महसूल विभाग सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करुन तालुक्यातील ३० गावांचा पैसेवारीत सूधारणा करुन ६५ पैशावरील ४८ पैशापेक्षा कमी आणेवारीत दुरुस्ती करण्यात आली. तत्पूर्वी तालुक्याची पैसेवारी ६५ पैसे शासनाला सादर करण्यात आली होती. ती नजर अंदाज आणेवारी चक्क ४८ टक्क्यावर आणून ३० गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखवून तात्काळ शासनाला अहवाल सादर करण्यात आला.
तालुक्यात ७९ गावे व ६३ ग्रामपंचायती आहेत. काही गावात गावात सिचंनाची साधने असली तरी जैतपूर, बारव्हा, पारडी, मुरमाडी, चिकना, नावशी, मासळ, बेलाटी या भागातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. यंदा पावसाचा लपंडाव यामुळे संपूर्ण धान शेती संकटात आली असतांना प्रशासनाने आणेवारी ६५ पैशापेक्षा जास्त दर्शवली होती.
इंग्रजकालीन आणेवारीची पशुधन शेतकऱ्यांसाठी मारक असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी मांडले. एकाच दिवशी कार्यालयात बसल्याने प्रयोगानुसार तालुक्याची पैसेवारी ६५ पैशावरुन ५० पैशापेक्षा कमी कशी काय होवू शकते, हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन बसला तरी. यानंतर आणेवारीचा विरोध केल्यानंतरच प्रशासन सूधारणा आणेवारीत करणार का. असा प्रश्न ५० पैशापेक्षा जास्त आणेवारी असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
शासनाला सुधारित आणेवारी सादर केल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी चंद्रशेखर टेंभूर्णे, तहसिलदार विजय पवार, पोलिस निरीक्षक प्रशांत कुलकर्णी, शिलमंतू सिव्हगडे, सरपंच दिघोरी, शंकर खराब, विलास ढोरे, बालू चुन्ने, विश्वनाथ तरोणे व अनेक शेतकरी उपस्थित होते. उपोषण कर्त्यापुढे प्रशासन झुकल्याची खमंग चर्चा सध्या सुरु आहे.(तालुका प्रतिनिधी)