अखेर ‘ते’ बांधकाम जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:36 PM2018-11-14T22:36:30+5:302018-11-14T22:37:03+5:30

वर्दळीच्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या प्रसाधनगृहाचे निर्माणाधीन बांधकाम पालिकेच्या अंतरिम आदेशावरून बुधवारी सायंकाळी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. बहुचर्चित ठरलेल्या या बांधकामात संबंधितांनी लाखो रुपयांनी हात ओले केल्याची शहरात चर्चा आहे.

After all, 'they' flatten the construction | अखेर ‘ते’ बांधकाम जमीनदोस्त

अखेर ‘ते’ बांधकाम जमीनदोस्त

Next
ठळक मुद्देभंडारा पालिकेची कारवाई : लाखोंची उलाढाल झाल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वर्दळीच्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या प्रसाधनगृहाचे निर्माणाधीन बांधकाम पालिकेच्या अंतरिम आदेशावरून बुधवारी सायंकाळी जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. बहुचर्चित ठरलेल्या या बांधकामात संबंधितांनी लाखो रुपयांनी हात ओले केल्याची शहरात चर्चा आहे. पोलीस बंदोबस्तात ही इमारत पाडण्यात आली.
मोठा बाजार परिसरातील जुन्या गभणे चौकात एका ज्वेलर्ससमोरील जागेत बांधकाम सुरु होते. पालिकेशी संबंधित असलेल्यांनी येथे बांधकाम करण्यासंदर्भात सेटींग करून प्रत्यक्षरित्या कामाला सुरुवातही केली. याच वेळी लक्षावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे ऐकीवात होते. एक नाही दोन नाही तब्बल चार जणांकडून लाखोंची माया गोळा करण्यात आल्याचीही यावेळी चर्चा होती.
याच दरम्यान तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याधिकारी ढेरे यांनी मोका चौकशी करून बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले होते. जवळपास तीन ते चार दशकांपासून येथे व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. लक्षावधी रुपये देऊनही बांधकाम पाडण्यात आल्याने हा कसला न्याय ? असा उपरोधिक प्रश्न विचारला जात आहे. तक्रार झाल्यानंतर सदर इमारतीचे दर्जात्मक बांधकामाची पाहणी करण्यात आली. यात चार इंचीच्या भिंतीवर प्रसाधनगृहाचा पाया उभारला जात होता. विशेष म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी आदेश देईपर्यंत स्लॅब घालण्याच्या कामापर्यंत इमारतीचे बांधकाम झाले होते. याच वेळी येथील छोट्या दुकानदारांना गाळ्यासाठीही जागा उपलब्ध करून देण्याचेही ठरले होते. त्याच आधारावर संगनमत झाल्याचेही ऐकीवात आहे.
बुधवारी सकाळपासूनच निर्माणाधिन बांधकाम पाडण्यासंदर्भात पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून हालचाली सुरु झाल्या. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बांधकाम पाडण्यासाठी पालिकेचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात जेसीबी घेऊन पोहचले. यावेळी सदर बांधकाम पाडू नये, आमचे नुकसान होईल अशी विनवणी लहान दुकानदारांनी केली. मात्र कारवाईचे आदेश निश्चित आहेत. त्यामुळे निर्माणाधिन बांधकाम पाडण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असे सांगताच जेसीबीच्या सहाय्याने ते बांधकाम पाडायला सुरुवात करण्यात आली. यावेळी थोडावेळासाठी तणाव निर्माण झाला होता. बुधवार मीनी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने व सदर इमारतीचे बांधकाम पाडण्याचे काम सुरु झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. बांधकाम पाडण्याची कारवाई वृत्त लिहिपर्यंत सुरुच होती.

Web Title: After all, 'they' flatten the construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.